राजुरा (चंद्रपूर) : Rajura Police Crime News राजुरा शहरात मध्यरात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सार्वजनिक रस्त्यावर धारदार कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली. आठवडी बाजार परिसरातील जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून ३६ सेंटीमीटर लांबीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. (हे हि वाचा – ओडिसा राज्यातून आला १७ किलो गांजा, एलसीबी ने केली कारवाई)
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार शहरात विशेष ऑल आऊट मोहीम राबविण्यात आली. या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rajura Police Crime News : रात्रीच्या गस्तीदरम्यान कोयत्यासह तरुण जेरबंद
शहरातील भरवस्तीत आणि सार्वजनिक रस्त्यावर धारदार कोयता बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला राजुरा पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून रंगेहात अटक केली आहे. आठवडी बाजार परिसरातील जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून घातक कोयता जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार शहरात सुरू असलेल्या विशेष नाकाबंदी व ‘ऑल आऊट ऑपरेशन’ मोहिमेदरम्यान ही धडक कारवाई करण्यात आली.
आठवडी बाजार परिसरात दहशत माजविण्याच्या तयारीत होता आरोपी
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजुरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे हे आपल्या पथकासह नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशन मोहिमेवर गस्त घालत होते. त्याच वेळी एका खास गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली की, राजुरा नाका क्रमांक ३ जवळील आठवडी बाजारातील सार्वजनिक रस्त्यावर एक तरुण हातात धारदार कोयता घेऊन संशयास्पदरीत्या फिरत आहे. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक लोकरे यांनी लागलीच दोन स्थानिक पंचांना सोबत घेतले आणि मध्यरात्री १२.१० च्या सुमारास जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्याकडे धाव घेतली.
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता बातमीदाराने वर्णन केल्याप्रमाणे एक इसम हातात शस्त्र घेऊन अंधारात फिरताना दिसून आला. पथकाने क्षणाचाही विलंब न लावता त्याला चारही बाजूंनी घेराव घालून ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने आपले नाव रणबीरसिंग रवींद्रसिंग भौन्ड (वय २६ वर्षे, रा. अंबादास वार्ड, मटन मार्केट, राजुरा) असे सांगितले. त्याच्या ताब्यात असलेल्या धारदार हत्याराबाबत परवान्याची विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नव्हता, तसेच रात्रीच्या वेळी हे हत्यार बाळगण्याबाबत त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी पंचांसमक्ष त्याच्याकडून लाकडी मूठ असलेला आणि टोकदार, वक्र पात्याचा ३६ सेंटीमीटर लांबीचा धारदार लोखंडी कोयता जप्त केला. हा कोयता कापडी पट्टीमध्ये बांधून कायदेशीररीत्या जागेवरच सील करण्यात आला. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ॲक्ट) कलम ४ आणि २५ अन्वये राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी नितीनकुमार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बळीराम राठोड या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, मध्यरात्री झालेल्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






