राजुरा – Rajura Satta Raid प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नाका क्रमांक ३ जवळील सार्वजनिक पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या सट्टा जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत दोन आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल, सट्टा बुक्स, चिटोरे, कॅल्क्युलेटर आणि इतर साहित्य असा ₹57,130 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (बल्लारपुरात सट्टा पट्टी जुगारावर एलसीबी ची कारवाई)
Rajura Satta Raid मध्ये दोन आरोपींना रंगेहात अटक
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या सट्टा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी छापा टाकून दोन आरोपींना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:३८ ते रात्री ८:१० वाजेच्या दरम्यान नाका नंबर ३ जवळील अनुराधा गोदामाच्या मागे असलेल्या सार्वजनिक शेडमध्ये करण्यात आली.
राजुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देवराम पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह शासकीय वाहनाने शहरात गस्त घालत असताना, त्यांना एका खात्रीशीर मुखबिराकडून माहिती मिळाली की सदर ठिकाणी दोन इसम लोकांकडून पैसे घेऊन सट्टा पट्टीचे आकडे लिहून हार-जीतचा जुगार खेळवत आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन त्या ठिकाणी अचानक छापा टाकला. पोलिसांना पाहताच जुगार खेळणारे काही ग्राहक तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र सट्ट्याचे आकडे लिहून घेणाऱ्या दोन मुख्य चालकांना पोलिसांनी पंचांसमक्ष जागेवरच ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे शंकर विश्वनाथ पेटकर (वय ५९, रा. हनुमान मंदिराजवळ, सास्ती, ता. राजुरा) आणि सोहेल समशेर शाह (वय २७, रा. बामनवाडा, राजुरा) अशी असल्याचे सांगितले. पोलिसांमार्फत आरोपींची आणि घटनास्थळाची झडती घेतली असता, त्यांच्याकडून ४५,७७० रुपये रोख रक्कम, १० नग स्टीलची नाणी, ९० सट्टा आकडे लिहिलेले कागदी चिटोरे, १२ सट्टा बुक्स, कार्बन कॉपी, १ ते ९ आकडे लिहिलेला पांढऱ्या रंगाचा बॅनर, दोन कंपन्यांचे बॉलपेन, एक कॅसिओ कंपनीचे कॅल्क्युलेटर, पत्त्यांचे तीन बॉक्स आणि १,००० रुपये किमतीचा लावा कंपनीचा व १०,००० रुपये किमतीचा आयक्यूओओ (IQOO) कंपनीचा मोबाईल फोन, असा एकूण ५७,१३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीनकुमार अजाबराव चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस शिपाई नुतन धनपाल डोरलीकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






