रोशन कुळे न्यायासाठी पायदळ मार्च काढण्याच्या भूमिकेत.

शरीरात एकच किडनी, मनात न्यायाची जिद्द; रोशन कुळे नागपूरकडे पायी निघणार!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 28, 2026

चंद्रपूर : रोशन कुळे यांनी न्यायासाठी ४ डिसेंबर २०२६ रोजी मिंथूर ते नागपूर पायदळ मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. किडनी विक्री प्रकरणातील न्याय, पुनर्वसन, आर्थिक मदत आणि जमिनीच्या परताव्यासह विविध मागण्या त्यांनी मांडल्या आहेत.

रोशन कुळे यांचा न्यायासाठी मिंथूर ते नागपूर पायदळ मार्च

अवैध सावकारीचा जाच आणि त्यानंतर घडलेल्या आंतरराष्ट्रीय किडनी विक्री प्रकरणाने हादरलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या मिंथूर गावातील रोशन शिवदास कुळे यांनी आता न्यायासाठी आरपारच्या संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. येत्या ४ डिसेंबर २०२६ रोजी मिंथूर ते नागपूर असा ‘पायदळ न्याय लॉंग मार्च’ काढण्यात येणार असून, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (आरोपीला पकडण्यासाठी गडचांदूर पोलिसांचा २ हजार किलोमीटरचा प्रवासात, वाचा बातमी)

अवैध सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकल्यानंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी रोशन कुळे यांना स्वतःची किडनी विकावी लागल्याची धक्कादायक घटना यापूर्वी समोर आली होती. कर्जाच्या तगाद्यामुळे जमीन, वाहन व संसारोपयोगी वस्तू विकूनही कर्ज फिटत नसल्याने अखेर त्यांना परदेशात नेऊन किडनी विक्रीस भाग पाडल्याचा आरोप या प्रकरणात झाला होता. या तक्रारीनंतर पोलीस तपासातून आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश होऊन विशेष पथकाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, किडनी गमावल्यानंतरही जमिनीचा ताबा, पुनर्वसन, आर्थिक मदत आणि उपचारांसाठी संघर्ष सुरूच असल्याचे चित्र आहे.

“माझ्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, मला सहानुभूती नको तर न्याय हवा,” अशी आर्त हाक देत रोशन कुळे यांनी आपल्या प्रमुख मागण्या पुढे केल्या आहेत. यामध्ये अवैध सावकारीवर कठोर कारवाई करणे, आंतरराष्ट्रीय किडनी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणे, कुटुंबाचे पुनर्वसन व आर्थिक मदत देणे, योग्य शासकीय रोजगार देणे तसेच शेती व संपत्तीची परतफेड करणे या मागण्यांचा समावेश आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या या लॉंग मार्चला महाराष्ट्रातील जनता, पत्रकार, सामाजिक संघटना यांनी साथ द्यावी, असे आवाहन रोशन कुळे यांनी केले आहे. न्याय मिळेपर्यंत अन्यायाविरोधातील हा लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment