Saturday, September 23, 2023
Homeचंद्रपूर ग्रामीणवरोरा येथील श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी ई- अभ्यासिकेचे लोकार्पण

वरोरा येथील श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी ई- अभ्यासिकेचे लोकार्पण

संस्कारी शिक्षण घेऊन समाजाचे ऋण फेडणारा विद्यार्थी घडावा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

- Advertisement -
- Advertisement -

News34

 

चंद्रपूर : शिक्षण हे केवळ पुस्तकी नव्हे तर संस्कारी असावे. आपण समाजाचे कोणीतरी लागतो, या भावनेतून संस्कारी शिक्षण घेऊन ऋण फेडणारा विद्यार्थी या अभ्यासिकेतून घडावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

वरोरा येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा तालुका अध्यक्ष डॉ भगवान गायकवाड,माजी नगराध्यक्ष एहतेशाम अली,श्रीमती जोगी,वरोरा विधानसभा प्रभारी रमेश राजुरकर,नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन भोयर,अभिजित मोटघरे,सूरज पूनवटकर, बाबासाहेब भागडे,आकाश वानखेडे,अमित गुंडावार,ओम मांडवकर, अमित चवले,सुरेश महाजन,सागर वझे,आकाश भागडे आदी उपस्थित होते.

श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी ई- अभ्यासिकेचे लोकार्पण झाले असे सुरुवातीला घोषित करून पालकमंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले, नगरपालिकेने अतिशय चांगले नियोजन करून ही अभ्यासिका उभी केली आहे. रस्ता, पूल या भौतिक सुविधेच्या गोष्टी थोड्या उशिरा तयार झाल्या तरी जास्त फरक पडत नाही, मात्र देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थी जेथे तयार होतात, अशा शैक्षणिक सुविधा त्वरित उभ्या करणे आवश्यक आहे. इतर देशात आर्थिक संपन्नता, भौतिक संसाधने आदी गोष्टी मुबलक प्रमाणात असल्या, तरी तेथील जीवन हे सुखी- संपन्नच राहील, याची शाश्वती नाही. मात्र आपला देश, आपला समाज हा कुटुंबवत्सल आहे. हेच संस्कार आपल्याला सुरुवातीपासून मिळाले आहेत. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना अशा संस्कारी शिक्षणाची गरज आहे. शेवटी देशाच्या गुणसंपन्नतेवरच आनंदाचा इंडेक्स ठरत असतो.

पुढे पालकमंत्री म्हणाले, चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी शिक्षणात वाघासारखाच पराक्रम करावा. राज्याचा मंत्री व या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रपूर, बल्लारशा, पोंभुर्णा येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सुरू करण्यात आले आहे. आपण निर्माण केलेल्या वास्तूमधून प्रशासकीय अधिकारी घडतात, याचा आपल्याला मनापासून आनंद आहे. विद्यार्थ्यांनो, खूप मोठे होऊन या शहराचे तसेच या जिल्ह्याचे नाव रोशन करा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शैक्षणिक सोयी सुविधांना प्राधान्य : आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात एकूण 205 विकास कामे करण्यात आली आहे. जिल्ह्यात शैक्षणिक सोयीसुविधांना विशेष प्राधान्य असून बाबा आमटे अत्याधुनिक अभ्यासिका तयार करण्यात आली आहे.

बल्लारपूर तयार करण्यात आलेल्या सैनिक शाळेतून भविष्यात देशासाठी लष्करी अधिकारी तयार होतील. बल्लारशा येथे सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर 50 एकर मध्ये 560 कोटी रुपये खर्च करून एस. एन. डी. टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, चंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, कृषी महाविद्यालय, चंद्रपूर येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा नवनवीन गोष्टी पूर्णत्वास येत आहे. एवढेच नाही तर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आज येथे घेतलेलं प्रण शपथ हा केवळ कार्यक्रम नाही, तर आपल्या हातून उत्तोमत्तम कार्य घडावे, त्यासाठी हा संकल्प करण्यात आला आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी वरोरा येथील शहीद योगेश डाहूले यांची वीरमाता पार्वताबाई आणि वीरपिता वसंतराव डाहूले यांचा ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी अभ्यासिकेच्या परिसरात ना.मुनगंटीवार यांनी वृक्षारोपण करून श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

प्रास्ताविकात मुख्याधिकारी गजानन भोयर म्हणाले, या ई – अभ्यासिकेसाठी पालकमंत्री यांनी खनिज विकास निधी अंतर्गत 3 कोटी 66 लक्ष रुपये मंजूर केले. या अभ्यासिकेमध्ये 30 संगणक, पेंटिंग कक्ष, प्रतिक्षालय, ग्रंथालय स्टोअर रूम आदी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेश खुळे यांनी केले. यावेळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक विविध संघटनांचे पदाधिकारी नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..