Saturday, September 23, 2023
Homeचंद्रपूरसार्वजनिक गणेश मंडळांसाठी उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा

15 सप्टेंबरपर्यंत नोंदविता येईल सहभाग

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : राज्य शासनाने, 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य विभागाकडून सदर स्पर्धा पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनीप्रदुषण रहित वातावरण, सामाजिक सलोखा व देखावे, स्वातंत्र चळवळ किंवा शिवराज्यभिषेकाच्या 350 वर्षानिमित्त सजावट व देखावा, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, वैद्यकीय कार्य, सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रम अन्य क्रीडास्पर्धा आदी कार्याचा गौरव व्हावा, तसेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली आहे.

 

या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट 44 गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या 44 गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित 41 गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक

 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई – मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला 18 सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

 

19 ते 28 सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस 1 ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट 3 गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व 12 ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

 

राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 4 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..