चंद्रपुरात एकाच दिवशी 3 अपघात 3 मृत्यूनंतरही प्रशासन निद्रावस्थेत

News34

चंद्रपूर: दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी एकाच दिवशी 3 नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्याने चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्था व जड वाहनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. नागपूर महामार्ग बंगाली कॅम्प व मूल मार्ग तसेच बायपास रस्त्यावरील जीवघेणे अपघात रोखण्याच्या मागणीसाठी आता जनविकास सेनेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

 

दुपारी 12 वाजता संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, महिला आघाडीच्या मनीषा बोबडे व युवा आघाडीचे अक्षय येरगुडे यांचे नेतृत्वात जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिवंगत अनिता ठाकरे यांना त्यांचा अपघात झाला त्याच ठिकाणी वाहतूक अडवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलिसांनी वाहतूक अडविण्यास अटकाव केल्यानंतर अर्धा तास जनविकासचे कार्यकर्ते पोलिसांशी झोंबले. संतप्त कार्यकर्ते व नागरिकांचा आवेश पाहून अखेर पोलिसांनी रस्त्यावरील अपघातस्थळी श्रद्धांजली अर्पण करू दिली.

जनविकास सेनेच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे व रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी अपघातस्थळी दिवंगत अनिता ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करून निवेदन स्वीकारल्यानंतर जनविकासच्या कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचा समारोप केला. शहरातील जीवघेणे अपघात रोखण्याचे हेतुने 8 दिवसांत उपायोजना आखणे सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जनविकास सेनेने जिल्हा प्रशासनाला दिला.

यावेळी निर्मला नगराळे, कुसुम उध्दार,किरण कांबळे, श्रुती कांबळे, माया डोईफोडे, पुष्पा मुळे,नेत्रा इंगुलवार, प्रतिभा तेलतुंबडे,मेघा दखणे, चंदा नैताम, संगीता मेश्राम,स्नेहल चौथाले,वसंता जोशी, विशाल बीरमवार, देवा पाचभाई, सुहास फुलझेले,चंद्रमणी पाटील , मनोहर धांडे,सोमेश्वर गीरडकर, अमोल पांढरे, प्रशांत काळे, प्रशांत थूटे, शरद दुरटकर, ओम कोमलवार,प्रतिक हरणे, वैभव लेडांगे,गिरीश ढवस,मनीष घनश्याम येरगुडे, देवराव हटवार ,इमदाद शेख,प्रफुल बैरम,गोलू दाखने, भूषण माकोडे, राहुल दडमल,आकाश लोड़े, शुभम चिंचोलकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील जीवघेणे अपघात रोखण्यासाठी नव्याने रिंग रोडचा प्रस्ताव, वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनविरुद्ध कारवाई, नियमानुसार वाहनतळ नसलेले हॉटेल, शोरूम ,बार- रेस्टॉरंट,दुचाकी विक्रेते,स्ट्रिट फूड विक्रेते, खाजगी ट्रॅव्हल्स इत्यादीं विरूद्ध कठोर कारवाई, मुख्य रस्ता व सर्विस लेन यांच्यामध्ये छोटे दुभाजक, नागपूर मार्गावर गजानन मंदिर चौकातील ट्राफिक सिग्नल सुरू करणे, सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत शहरातून जड वाहतुकीवर बंदी घालणे अशा विविध उपाययोजना आखण्यासाठी पुढील 8 दिवसांत कार्यवाही सुरू करण्याची जनविकास सेनेची मागणी आहे.

 

तर कदाचित अनिता ठाकरे यांचा जिव वाचला असता…

16 मार्च 2022 रोजी जनविकास सेनेने नागपूर मार्गावरील एमडीआर मॉल, जुना वरोरा नाका चौक, आंबेडकर भवन मार्ग अशा विविध पाच अपघातप्रवण स्थळांची ओळख पटवून गतिरोधक लावण्याची मागणी बांधकाम विभागाला केली होती. मात्र दीड वर्षात बांधकाम विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. एमडीआर माॅलसमोर नागपूर कडे जाणाऱ्या मार्गावर गतिरोधक असते तर ट्रकची स्पीड कमी झाली असती व 15-20 मीटर अंतरावर झालेल्या अपघातात कदाचित दिवंगत अनिता ठाकरे यांचा जीव वाचला असता.

असा झाला अपघात…

गायत्री अलाइनमेंट समोर उभ्या असलेल्या एका स्कार्पियो चालकाने अचानक गाडी मागे घेऊन मुख्य रस्त्यावर नेल्याने अनिता ठाकरे यांना बाजुला जावे लागले. त्याच वेळी भरधाव वेगाने मागून येणाऱ्या ट्रक चालकाने छोट्या टेम्पोला डाव्या बाजूने ओव्हरटेक केल्याने अनिता ठाकरे यांच्या गाडीला धडक दिली व अपघात झाला. चौकशी करून सर्व दोषीविरुद्ध कारवाई करण्याची जनविकास सेनेची मागणी आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!