चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विरोधात भारतीय आझाद कांग्रेस पक्षाचे आंदोलन

News34 chandrapur

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने १ एप्रिल २०२३ पासून वीज दरात वाढ केली आहे. याविरोधात भारतीय आझाद काँग्रेस पक्षाने आघाडी उघडली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. वाढलेले दर रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली होती, अन्यथा आंदोलनाचा इशाराही निवेदनात राज्य सरकारला देण्यात आला होता.

 

दिलेल्या निवेदनाला प्रतिसाद न मिळाल्याने भारतीय आझाद काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला.  13 सप्टेंबर रोजी गांधी चौक, चंद्रपूर येथे भारतीय आझाद काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात आले. आणि वाढीव दराबाबत लोकप्रतिनिधी गप्प का आहेत, असा सवाल आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विचारण्यात आला. आणि येत्या काळात हे लोकप्रतिनिधी सरकारला वाढलेले वीजदर मागे घेण्यास भाग पाडतील का? असा प्रश्नही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आयुबभाई कच्छी यांनी उपस्थित केला.

 

कच्छी पुढे म्हणाले की, वाढीव वीज दरामुळे सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना वाढलेले विजेचे दर मोजावे लागत आहेत. लोकप्रतिनिधींना या सर्व सुविधा मोफत मिळतात. 200 युनिट मोफत वीज देण्याच्या आश्वासनावर चंद्रपूर शहराचे आमदार निवडून आले आणि आश्वासनाचा विसर पडला. वाढलेल्या वीजदरांवरही आमदार किशोर जोरगेवार बोलायला तयार नाहीत, अशी अवस्था झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेही सरकारने वाढवलेल्या वीज दरांवर मौन बाळगून आहेत.

 

कदाचित विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका माहीत नसेल. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचा विकासपुरुष म्हणवणारे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हेही सरकारच्या विरोधात बोलण्याचे टाळत आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सर्व आमदारही वाढीव वीज दरांवर गप्प बसले आहेत. वाढीव वीज दरांबाबत जनहिताच्या मागणीसाठी आवाज उठवणारा पहिला पक्ष भारतीय आझाद काँग्रेस पक्ष आहे.

 

आम्ही निवडून दिलेले सर्व लोकप्रतिनिधी आता फक्त स्वतःचे हित पाहत आहेत हे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने आता समजून घेतले पाहिजे असे सांगितले. या लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. भारतीय आझाद काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे जो जनहिताच्या मागणीसाठी आवाज उठवतो. आणि यापुढेही सरकारने वाढलेले वीजदर रद्द न केल्यास भारतीय आझाद काँग्रेस पक्षातर्फे हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.

 

भारतीय आझाद काँग्रेस पक्षातर्फे वाढीव वीज दराबाबत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय आझाद काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येने लोक सामील झाले असून भारतीय आझाद काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आयुब भाई कच्छी यांनी जनहिताच्या मागणीसाठी सरकारला एकदिवस बाध्य करू तोपर्यंत आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन केले.

 

यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब भाई कच्छी, भारतीय आझाद युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्शद कच्छी, राजा भाई, साबीर हुसेन, गुफरान शेख, अरबाज कच्छी, नदीम कुरेशी, नईम कुरेशी, इर्शाद शेख, सुहास रामटेके, यादव मॅडम, आसिफ रजा, सैफ शेख, आ. फैजल पाशा, रशीक शेख, फैजान शेख, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!