शिवसेना म्हणते आता होऊ द्या चर्चा

News34

भद्रावती : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) द्वारा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविल्या जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून थेट जनतेत जावून त्यांच्याशी विविध रूपाने नाळ जोडण्याचा प्रयत्न शिवसेना (ऊबाठा) पक्ष करीत आहे. याच पठडीतला “होऊ द्या चर्चा” हा थेट जनतेत जावून मतदारांना बोलत करणारा उपक्रम पक्षातर्फे घेण्यात आलेला आहे. त्याची सुरुवात शेतकऱ्यांचा वर्षातील सर्वात मोठा बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

 

सदर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यमान बोलघेवड्या राज्य सरकारच्या कामाची व योजनांची पुरेपुर कल्पना जनतेला यावी, या उद्देशाने बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी “होऊ द्या चर्चा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

या उपक्रमाबद्दल माहिती देताना रविंद्र शिंदे म्हणाले की, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात अडीच वर्षे मुख्यमंत्री राहून जन-कल्याणकारी कार्य केले. ठाकरे सरकारने  शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली. त्यांच्या कारकिर्दीत कोविड-१९ चा प्रादुर्भाव देशभरात पसरलेला होता. त्या दरम्यान कोरोणा काळातील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. संयमी राहून कामांचा धडाका त्यांनी राज्यात राबविला होता. त्याउलट ज्या आमदारांना शिवसेनेने बनविले तेच पक्षाला बेईमान झाले व विद्यमान सरकार स्थापन केले.

 

“खोटे बोला पण रेटून बोला”, या उक्तीप्रमाणे केवळ बोलघेवडेपणा करून सध्या राज्य सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. विद्यमान राज्य सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर यावा. फक्त कागदावर व सरकार मधील नेत्यांच्या तोंडावर असलेल्या योजनांचा भांडाफोड व्हावा, गद्दारांची गद्दारी व एक फुल दोन हाफ सरकारचे अपयश जनतेसमोर आणावे, या हेतूने सदर उपक्रम जनतेत जावून राबविल्या जात असल्याचे रविंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.

शिवसेना (ऊबाठा) पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक जनतेत जावून ठाकरे सरकार व शिंदे सरकार या दोन्ही सरकारच्या काळातील कारकिर्दीची तुलनात्मक चर्चा या उपक्रमाच्या माध्यमातून करणार असून जनतेच्या मनातील उत्कृष्ठ सरकार कोणते, हे जाणून घेणार आहे.

जनतेनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना (ऊबाठा) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!