News34 chandrapur
गुरू गुरनुले
मूल : कौटुंबिक वादामधुन रागाच्या भरात एका युवकाने तलावात उडी घेवुन जीवन संपविल्याची घटना मूल शहरात घडली. गुलाब मारोती मंकीवार असे मृतकाचे नांव आहे.
सावली तालुक्यातील चारगांव येथील रहीवाशी गुलाब मारोती मंकीवार (२८) हा मागील काही महीण्यांपासुन मूल येथील साईश्रध्दा रेस्टारंट येथे कामावर होता. नेहमी प्रमाणे दुपारी १२.३० वा. चे दरम्यान गुलाब जेवनासाठी म्हणुन कामावरून घरी आला. सवयीप्रमाणे गुलाब दारू पिवुन घरी आल्यानंतर त्याने पत्नीला मोबाईल मागीतला. गुलाबने यापुर्वी दोनदा मोबाईल नेवुन विकले असल्याने पत्नीने त्याला मोबाईल देण्यास विरोध केला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले.
भांडणाचे रूपांतर हातघाईवर आले. यावेळी मृतक गुलाबची आई, सासु आणि सासरे उपस्थित होते. पती पत्नीचा वादात त्यांनी मध्यस्थी करून गुलाबला समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याला राग अनावर झाल्याने तो घरून धावत येवुन स्थानिक बस स्थानका लगतच्या तलावात उडी मारली.
युवकाने तलावात उडी मारल्याचे समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश बंसोड यांनी सहका-यांसह घटनास्थळ गाठले. भोई समाजातील काही मंडळीच्या सहकार्याने तलावात शोध घेतल्यानंतर तब्बल दोन तासानंतर गुलाबचे पार्थीव गळाला लागले. शव विच्छेदना नंतर गुलाबचे पार्थीव त्याच्या कुटूंबियाचे स्वाधीन करण्यात आले.मृतकाला चार वर्षाची मुलगी आहे.