चंद्रपूर जिल्ह्यात 28 वर्षीय युवकाची हत्या

News34 chandrapur

चंद्रपूर : राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीतील वॉर्ड क्रमांक दोन मधील साई मंदिर जवळ राहत असलेला एका युवकाचा रामपूर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घूण खून केल्याची घटना मंगळवारी 10 ऑक्टोबर ला सायंकाळी उघडकीस आली आहे. संदीप देवराव निमकर (वय २८) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

 

राजूरा शहरालगतच्या रामपुर येथे संदीप निमकर हा आपल्या आई वडिलांसह राहत होता. सोमवारी रात्री आठ वाजता घरून निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने राजूरा पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांनी दाखल केली होती. तो घरी परत न आल्याने रात्रीपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली, परंतु रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही.

 

तो मित्रांसोबत नेहमी जात असलेल्या ठिकाणी नातेवाईक शोध घेत असताना रामपुर लगत असलेल्या जंगलात माथरा रोड जवळ झुडपी जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. लगेच सदर घटनेची माहिती राजुरा पोलिस ठाण्यात देण्यात आली. ठाणेदार योगेश पारधी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

 

राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीत काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी राजुरा शहरातील नाका नंबर तीन येथे झालेल्या खुनात रामपुर येथीलच आरोपी निघाले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल, कोळसा व भंगार चोरीचे प्रकरण समोर येत आहेत. तसेच या ठिकाणी जुगार व सट्टा चालतो. या परिसरातील युवक अवैद्य व्यवसायात गुंतले आहेत. याच प्रकरणातून ही घटना घडल्याचे सांगितल्या जात आहे. मृतक संदीप निमकर यांच्या घराशेजारी असलेल्या साई मंदिर समोर मोठ्या प्रमाणत अवैद्य धंदे सुरू आहेत. जुगार, सट्टा चालतो. माथरारोडवरील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात कोळसा, डिझेल चोरीसह जुगार खेळल्या जात आहे.

 

राजुरा शहर हे गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून अस्तित्वात येत आहे, गोळीबार प्रकरण असो की गांजा तस्करी, कमी वयाची मुले आता बंदूक खेळण्यासारखे जवळ ठेवतात, विशेष म्हणजे राजुऱ्यात कोळसा तस्करांचे मोठे नेटवर्क आहे, दिवसाढवळ्या या ठिकाणी कोळशाची तस्करी केल्या जाते, पण कायद्याचे रक्षक सुद्धा यावर कारवाई करणे टाळतात.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!