15 तासांनी प्रकल्पग्रस्तांचे विरुगिरी आंदोलन मागे

News34 chandrapur

चंद्रपूर – अदानी समूहाने घेतलेल्या कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या प्रकल्पगस्त शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्याने रात्री आठच्या सुमारास विरूगिरी आंदोलन मागे घेण्यात आले. शुक्रवारी पहाटे पाच वाजतापासून कंपनी परिसरातील टॉवरवर चढून सहा तरूणांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला होता.

आंदोलकांमध्ये आकाश लोडे, अविनाश विधाते, तुषार निखाडे ,संजय मोरे,संदीप वरारकर, सचिन पिंपळशेंडे यांचा समावेश आहे. भूसंपादन कराराचे उल्लंघन करणाऱ्या अंबुजा कंपनीचे भूसंपादन रद्द करून शेतकऱ्यांना जमीनी परत द्याव्या नाहीतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीमध्ये स्थायी नोकरी द्यावी आदी मागण्यां आंदोलनादरम्यान करण्यात आल्या होत्या.

 

कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनी म्हणजेच पूर्वीच्या मराठा सिमेंट कंपनीने शासनासोबत केलेल्या भूसंपादन करारातील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना स्थायी नोकरीमध्ये प्राधान्य न देता प्रकल्पग्रस्त आदिवासी व गैर-आदिवासी शेतकऱ्यांना नोकरीपासून वंचित ठेवले. त्याऐवजी स्थानिक रहिवासी असल्याचे खोटे दाखले तयार करून बाहेरच्या लोकांना रोजगार देण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना डावलल्याने स्थानिक तरूण व प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वंचीत ठेवल्याने संतापलेले सहा प्रकल्पग्रस्त शेतकरी पिंपळगाव येथील आकाश लोडे, अविनाश विधाते, उपरवाहीचे तुषार निखाडे ,संजय मोरे,संदीप वरारकर व लखमापूर येथील सचिन पिंपळशेंडे यांनी शुक्रवारी पहाटे पाच वाजता कंपनी परिसरातील मोबाईलच्या उंच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले.

 

पहाटे पाच ते सायंकाळी 8 वाजतापर्यंत सहा युवक विरूगिरी स्टाईलने टॉवरवर आंदोलन करीत होते. उपविभागीय अधिकारी यांन या आंदेालनाची दखल घेत घटनास्थळी दाखल झाले. प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्यांना प्राधान्याने घेऊन नागपूरात या विषयी आठवडाभरात बैठक लावून न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!