News34 chandrapur
चंद्रपूर : दाताळा मार्गावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला यार्डमधील ठोक व्यापाऱ्यांकडून आवारात किरकोळ विक्री केली जात असल्याने शहरातील अनेक ग्राहक स्वस्त भाजीपाल्यासाठी कृउबासच्या भाजीपाला यार्डमध्ये येतात. याचा परिणाम शहरातील गंजवार्ड आणि गोलबाजारातील भाजीविक्रेत्यांवर होत असून, या दोन्ही बाजारात ग्राहकांची संख्या कमी होत असल्याने विक्रेत्यांची उपासमार होत आहे.
दहा दिवसात कृउबासच्या भाजीपाला यार्डमधून किरकोळ भाजीपाला विक्री थांबविण्यात यावी, अन्यथा भाजीपाला यार्ड प्रवेशद्वारावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा किरकोळ भाजीपाला व्यावसायिकांसह हिमायू अली यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.
दाताळा मार्गावर कृउबासचे मोठे भाजीपाला मार्केट आहे. दूरवरून तसेच अन्य जिल्ह्यातून व राज्यातून येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणला जातो. हा भाजीपाला किरकोळ विक्रेते खरेदी करून गोलबाजार, गंजवार्ड, बंगाली कॅम्प, तुकूम येथील भाजीबाजारात ग्राहकांना विकतात.
भाजीपाला यार्डमधील मोठ्या व्यापाऱ्यांना किरकोळ विक्रीची परवानगी नसतानाही अनेक व्यापारी स्वत:च्या हमालांमार्फत येथे किरकोळ विक्री केली जात आहे. त्यामुळे शहरातील ग्राहक स्वस्त भाजीपाला मिळण्याच्या अपेक्षेने भाजीपाला यार्डमधून भाजीपाला खरेदी करीत आहे. त्यामुळे गंजवार्ड, गोलबाजार व अन्य बाजारात भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमालीची घटली आहे. याचा परिणाम येथील किरकोळ व्यावसायिकांच्या आर्थिक उत्पन्नावर होत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होत आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर व्यावसायिकांच्या डोक्यावर वाढत आहे. याच कर्जबाजारीतून दोन व्यावसायिकांनी आपले जीवन संपविल्याचा आरोप यावेळी किरकोळ व्यावसायिकांनी केला आहे.
यापूर्वी किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला यार्डमध्ये भाजीपाला विक्रीस विरोध केला होता. यानंतर काही महिने किरकोळ भाजीविक्री बंद करण्यात आली. तसा फलकही प्रवेशद्वारावर लावण्यात आला. मात्र, यानंतर पूर्ववत भाजी यार्डमध्ये किरकोळ भाजीपाला विक्री केली जात आहे. दरम्यान, काही व्यावसायिकांनी कृउबासच्या पदाधिकाऱ्यांसह काही व्यापाऱ्यांना नोटीस पाठविली. परंतु, भाजीयार्डमध्ये किरकोळ विक्री होत नसल्याची दिशाभूल करणारे उत्तर या नोटीसला देण्यात आले.
कृउबासच्या यार्डमधील किरकोळ विक्री त्वरित बंद करण्यात यावी, अन्यथा प्रवेशद्वारावर चक्काजाम आंदोलन करू असा इशारा हिमायू अली यांच्यासह गंजवार्ड येथील भाजीपाला व्यावसायिकांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला गंजवार्ड येथील भाजीविक्रेता उपबाजार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम साखरकर, शिल्पा कांबळे, अर्चना खोब्रागडे, विरेंदर सिंग, शंकर दानव व अन्य भाजीपाला विक्रेते उपस्थित होते.