Thursday, December 7, 2023
Homeताज्या बातम्यानागरिकांनो महावितरणच्या इज ऑफ लिव्हिंग सेवेचा लाभ घेतला का?

नागरिकांनो महावितरणच्या इज ऑफ लिव्हिंग सेवेचा लाभ घेतला का?

जुन्या मालमत्तेच्या खरेदीनंतर वीजजोडणीच्या नावात आपोआप बदल

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर /जुनी सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी किंवा बिल देखील स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना महावितरणकडून उपलब्ध झाली आहे. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात आली आहे. जुनी मालमत्ता खरेदीदारांनी दस्तनोंदणीपूर्वी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ करताना वीजबिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडल्यास त्याबाबतची पुढील प्रक्रिया महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने करण्यात येत आहे.

 

‘इज ऑफ लिव्हिंग’ नुसार महावितरणकडून ग्राहकसेवा देण्याची सूचना उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार महावितरण आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संयुक्त सहकार्यातून वीजबिलामध्ये नावात बदल करण्याची स्वयंचलित प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी जुने घर किंवा दुकानाची खरेदी केल्यानंतर वीजजोडणी किंवा बिलावरील नाव बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे तसेच ओळखपत्र, इंडेक्स दोन व इतर कागदपत्रे अपलोड करण्याची स्वतंत्र प्रक्रिया करावी लागत होती. तथापि दस्तनोंदणीच्या वेळीच वीजबिल नावावर करून घेण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे वीजग्राहकांचा मोठा वेळ वाचणार आहे. आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत या तत्पर सेवेचा जुने घर किंवा दुकानाच्या खरेदीदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

नोंदणी व मुद्रांक विभागाने (आयजीआर) मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ हे पोर्टल कार्यान्वित केले आहे. जुन्या घराची किंवा दुकानाच्या दस्तनोंदणीपूर्वी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ मध्ये माहिती भरताना वीजजोडणी किंवा बिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त अर्जानुसार महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने वीजबिलावरील नाव बदलण्याची प्रक्रिया सुरु होईल. याबाबत ६० दिवसांच्या आत संबंधित मालमत्ता खरेदीदारास ‘एसएमएस’द्वारे कळविले जात आहे व प्रक्रिया शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी वेबलिंक पाठविण्यात येत आहे. यासोबतच प्रक्रिया शुल्काचे इन्व्हाईस महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.

 

एकाच नावाने मालमत्तेची खरेदी झाली असल्यास अर्जदाराने कोणतेही दस्ताऐवज अपलोड करण्याची गरज नाही. तर एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे खरेदी असल्यास ज्या व्यक्तीच्या नावे वीजजोडणी करायची त्यासाठीची संमती व ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात येईल. याबाबत संबंधित नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर महावितरणकडून ‘एसएमएस’ द्वारे संदेश व वेबलिंक पाठविली जात आहे. तथापि, ‘एसएमएस’ पाठविल्यानंतर ६० दिवसांच्या आत प्रक्रिया शुल्काचा भरणा केला नाही किंवा आवश्यकतेनुसार ना हरकत प्रमाणपत्र वेबलिंकद्वारे अपलोड केले नाही तर नावात बदल करण्याची प्रक्रिया आपोआप रद्द होईल. त्यानंतर वीजजोडणीच्या नावात बदल करण्यासाठी ग्राहकांना सध्याच्या पद्धतीनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करावी लागेल.

 

जागेच्या खरेदीपूर्वी थकबाकी तपासून घ्या- जागेच्या पूर्वीच्या मालकाने किंवा ताबेदाराने न भरलेल्या वीजबिलांची थकबाकी नंतरच्या नवीन मालक / ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे जुने घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी वीजबिलाची थकबाकी तपासून घेणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular