News34 chandrapur
चंद्रपूर – मागील 5 दिवसापासून चंद्रपूर मनपा अंतर्गत काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे कामबंद आंदोलनाने आज आक्रमक पवित्रा घेतला, कचरा संकलन करणाऱ्या वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे घंटागाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
हक्काच्या किमान वेतनासाठी कामगार आपली लढाई लढत आहे, विशेष म्हणजे मागील 5 दिवसापासून स्थानिक आमदार व मंत्री यांनी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही, हे विशेष.
कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन मागील 2 दिवसापासून बंद आहे, शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरत आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कामगारांच्या आंदोलनाचा लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी भूमिपुत्र ब्रिगेडच्या सदस्यांनी मनपा अधिकाऱ्यांची भेट घेतली.
भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेतर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मनपाला निवेदन सादर केले, ज्यामध्ये संपावर बसलेले कामगार यांच्या आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा जेणेकरून शहरात कचरा संकलनाला सुरुवात होईल, आंदोलनामुळे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घंटागाडी कामगारांचे आंदोलन सुरू राहिले तर शहरातील नागरिक आपल्या घरातील कचरा चंद्रपूर मनपा कार्यालयात टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा डॉ.गावतुरे यांनी यावेळी दिला आहे.
मनपा अधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी छाया सोनूले, संगीता पेटकुले, काळूबाई चौधरी, आदींची उपस्थिती होती.
कामगारांच्या हक्काच्या मागणीवर मनपा प्रशासन डोळेझाक करीत आहे ही गंभीर बाब असून त्यांची मागणी रास्त आहे, कामगारांना न्याय मिळायला हवा अशी प्रतिक्रिया डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी दिली.