डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

News34 chandrapur

चंद्रपूर : ‘नागपूर आणि चंद्रपूर हा परिसर जगात ‘टायगर कॅपीटल’ म्हणून ओळखला जात असला तरी या दोन्ही जिल्ह्यांत बाबासाहेबांनी 1956 सालीच वाघाची डरकाळी दिली आणि संपूर्ण देशाने ही डरकाळी ऐकली आहे. या महामानवाने दिलेल्या संविधानात स्वातंत्र्य, अधिकार, जबाबदारी आणि कर्तव्याचाही समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने संविधान वाचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालण्याचा संकल्प करावा व त्यातून जगण्याची प्रेरणा घ्यावी,’ असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल ट्रस्टच्यावतीने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी महामानवाला अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष अरुण घोटेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री आमदार सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे आदी उपस्थित होते.

 

देशात आज 750 पेक्षा जास्त जिल्हे आहेत, मात्र नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांचे विशेष महत्त्व आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘14 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे तर दोन दिवसांनी म्हणजे 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. हे दोन्ही जिल्हे आज वाघांसाठी प्रसिद्ध आहेत. पण 1956 मध्येच बाबासाहेबांची डरकाळी संपूर्ण देशाने ऐकली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसारच देशाची आणि राज्याची वाटचाल सुरू आहे. संविधानात प्रत्येक गोष्टीचा उल्लेख त्यांनी केला आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, अधिकार यासोबतच प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीची आणि कर्तव्याचीसुध्दा जाणीव करून देण्यात आली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे केवळ स्मरण करून थांबू नये तर, त्यांच्या विचारांवर अंमल करावे लागेल. आणि त्यासाठी प्रत्येकाला संविधानाचे वाचनही करावे लागेल.

 

महापुरुषांना भारतापुरता मर्यादित समजू नये

‘भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतापुरतेच मर्यादीत नाही तर संपूर्ण जगाला वैचारीक प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा जीवन जगण्याचा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला आहे. गौतम बुद्धांचा शांततेचा आणि समतेचा संदेश संपूर्ण जगात पोहचला आहे. केंद्र शासन आज बुद्धगया, नालंदा, विक्रमशिला, सारनाथ, कपिलवस्तू, राजगीर, वैशाली, श्रावस्ती या ठिकाणांना जोडणारे बुद्ध सर्किट तयार करीत आहे,’ असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

एस.एन.डी.टी. विद्यापीठ आणि चंद्रपूर फ्लाईंग क्लब ठरणार विद्यार्थ्यांसाठी गेमचेंजर

कौशल्य विकासावर आधारीत प्रशिक्षण आणि रोजगारासाठी चंद्रपूरमध्ये एस.एन.डी.टी विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येत आहे. तसेच आगामी काही महिन्यातच चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आदी विद्यार्थी–विद्यार्थीनींसाठी या बाबी गेमचेंजर ठरणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!