वर्ष 2018 नंतर पुन्हा रेल्वेच्या धडकेत वाघाच्या बछड्याचा मृत्यू

News34 chandrapur

चंद्रपूर – चांदा फोर्ट गोंदिया मार्गावरील नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा गावाजवळ रेल्वेच्या धडकेत एका पट्टेदार वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

 

चंद्रपूर गोंदिया मार्गावरील नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा गावाजवळ आज सोमवारी सकाळी रेल्वे लाईनवर कामगार काम करण्यासाठी गेले असता त्यांना रेल्वे रुळाच्या बाजूला पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती जवळील गावातील नागरिकांना होताच नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली. कामगारांनी सदर घटनेची माहिती नागभीड वनविभागाला दिली.

 

वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होवून मृतदेह ताब्यात घेतला आहे. प्राथमिक पाहणीत रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रेल्वे मार्ग ओलांडताना त्याला धडक लागली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. रेल्वेच्या धडकेत वन्यप्राणी मृत्यूमुखी पडण्याच्या घटनांत वाढ झालेली आहे. वन्पाण्यांचे जीव वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्या अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

याआधी सुद्धा घडल्या घटना

15 नोव्हेंबर 2018 ला बल्लारपूर-गोंदिया रेल्वेच्या धडकेत 3 वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाला होता, या घटनेनंतर वनविभागाने रेल्वे प्रशासनाला जंगल परिसरातून रेल्वेचा वेग कमी करण्यास सांगितले होते, मात्र ऑक्टोबर 2019 मध्ये पुन्हा बल्लारपूर-गोंदिया रेल्वेच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता.

 

27 नोव्हेम्बरला उघडकीस आलेली घटना कशी घडली?

1 डिसेंबर ला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर गोंदिया-चांदा फोर्ट रेल्वे मार्गाचा दौरा करणार आहे, या संदर्भात आढावा घेण्यासाठी DRRM नमिता त्रिपाठी यांचा सोमवारी दौरा होता, त्रिपाठी यांना घेण्यासाठी गोंदियावरून पहाटे चांदा फोर्ट साठी स्पेशल गाडी निघाली होती, या विशेष रेल्वेने पहाटे 3 वाजताच्या सुमारास किटाळी-मेंढा जवळ वाघाच्या बछड्याला धडक दिली. या धडकेत बछड्याचा जागीच मृत्यू झाला.

 

Leave a Comment

error: Content is protected !!