News34 chandrapur
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बालविकास विभाग, सी.सी.डी.टी. आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘बालस्नेही’ पुरस्कार – 2023, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदान करण्यात आला.
महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते श्री. जॉन्सन यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से) व इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील बालकांचा सर्वांगीण विकास व बाल हक्क संरक्षण, त्यांची सुरक्षा, आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण विषयावर अनेक प्रशासकीय यंत्रणा जसे बालगृह, बालकल्याण समिती, ई-यंत्रणा व स्वयंसेवी संस्था सकारात्मक पध्दतीने मोलाचे कार्य पार पाडत आहेत. हे काम करणारे अधिकारी / कर्मचारी व संस्थांना बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी 22 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई येथील यशंवतराव चव्हाण सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर पुरस्कारासाठी आपल्या जिल्हयातील विवेक जॉन्सन यांची उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.