विकसीत भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहचा – सहसचिव आनंद पाटील

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात 23 नोव्हेंबर 2023 पासून ‘विकसीत भारत संकल्प यात्रेचा’ शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतीमध्ये सदर यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. ज्यांना आतापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने प्रत्येक यंत्रणेने यात गांभिर्याने काम करावे, अशा सुचना केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाचे सहसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे चंद्रपूर जिल्ह्याचे नोडल अधिकारी आनंद पाटील यांनी दिल्या. तत्पुर्वी विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान त्यांनी तीन गावांना भेटी दिल्या व गावक-यांशी संवाद साधला.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकार विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त चंदन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मिना साळूंके यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

 

या यात्रेच्या माध्यमातून विविध विभागांनी स्वत:हून लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, असे सांगून सहसचिव आनंद पाटील म्हणाले, आपल्यापर्यंत लाभार्थी येण्याची वाट पाहू नका. जिल्ह्यात ज्या ठिकाणी या यात्रेचा चित्ररथ जाईल, तेथे संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी भेटी द्याव्यात. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर योजनेचा लाभ मिळालेल्या किमान तीन लाभार्थ्यांचे मनोगत घ्यावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा यात समावेश करावा तसेच योजनेचे व्हीडीओ क्लिप करून ते यात्रेदरम्यान दाखवावे. यात्रा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात किती लाभार्थी होते, आणि उपक्रम झाल्यानंतर किती लाभार्थ्यांना लाभ दिला, त्याचीही आकडेवारी आतापासून गोळा करा.

 

पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारकडून विकसीत भारत संकल्प यात्रा हा महत्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात 17 महत्वाच्या योजनांची माहिती या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. ज्यांना आतापर्यंत कोणत्याच योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा नागरिकांपर्यंत पोहचण्याचा हा प्रयत्न आहे.

 

सदर योजनेत काय – काय लाभ मिळू शकतात, कोण लाभार्थी होऊ शकतात, यासदंर्भात एकत्रित माहिती देण्यात येत असून केंद्र सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्यात 7 ते 10 चित्ररथ पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात पी.एम. विश्वकर्मा योजनेचे उद्दिष्ट ठरवावे. गावस्तरावरील लोकांना बँकांच्या विविध योजनांची माहिती तसेच बँकेच्या व्यवहाराबाबत माहिती द्यावी, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

 

यावेळी सादरीकरणात जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यात 825 ग्रामपंचायती असून 1836 गावे आहेत. विकसीत भारत संकल्प यात्रेच्या यशस्वी अंमलबजावणीकरीता नोडल अधिका-यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी स्तरावर त्याचा नियमित आढावा घेण्यात येत असल्याचे श्री. गौडा यांनी सांगितले.

 

सहसचिवांच्या तीन गावांना भेटी : विकसीत भारत संकल्प यात्रेचे नियोजन, गावागावात होणारी अंमलबजावणी पाहण्यासाठी सहसचिव आनंद पाटील यांनी टेमुर्डा (ता. वरोरा), नंदोरी (ता. भद्रावती) आणि सोनेगाव (ता. चंद्रपूर) या तीन गावांना भेटी देऊन गावक-यांशी संवाद साधला.

 

यात्रेत समाविष्ट असलेल्या योजना : पी.एम. स्वनिधी योजना, पी.एम. विश्वकर्मा, पी.एम. उज्वला, पी.एम. मुद्रा लोन, स्टार्टअप इंडिया – स्टँड अप इंडिया, आयुष्मान भारत, पी.एम. आवास (शहरी), स्वच्छ भारत अभियान (शहरी), पी.एम. ई-बस सेवा, अमृत योजना, पी.एम. जनऔषधी योजना, उजाला योजना, सौभाग्य योजना, डिजीटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर योजना, खेलो इंडिया, आर.सी.एस. उडाण आणि वंदे भारत ट्रेन्स व अमृत भारत स्टेशन स्कीम.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!