सरपंच संघटनेच्या उपोषण आंदोलनाची पालकमंत्री व प्रशासनाने घेतली दखल

News34 chandrapur

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने 13 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत साखळी पोषण व तीन दिवस अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, ग्रा.पं.आवाळपूरचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी आमरन उपोषण केले. विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांचा पाठिंबा व स्थानिक नागरिकांचा रोष बघता अखेर 18 नोव्हेंबरला रात्री 10 वाजता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटले. या आंदोलनाची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. मागण्यांची पूर्तता करण्याचे निर्देश त्यांनी अल्ट्राटेक प्रशासनाला दिले आहे.

 

जिल्हाधिकारी डॉ.विनय गौडा, मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगडे, कोरपना तहसीलदार व्हटकर, अल्ट्राटेकचे सीएसआर प्रमुख प्रतीक वानखेडे, किरण करमणकर, सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई व दत्तक गावातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे नियोजन भवनात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा सचिव रत्नाकर चटप यांनी सरपंच संघटनेच्या मागण्यांविषयी चर्चा केली.

 

अल्ट्राटेक कंपनीने गावासाठी मोठ्या प्रमाणात सीएसआर निधी खर्च करावा, गावातील पांदण रस्त्यासाठी कंपनीच्या डोलामाईट मधून पांदन रस्त्याचे बांधकाम करावे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा या प्रमुख मागण्या केल्या. पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सदर मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, तहसीलदार व अल्ट्राटेक प्रशासनाला दिले. परिसरातील व दत्तक गावातील आयटीआय, पॉलिटेक्निक, बीई झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगार, दत्तक गावांमध्ये सुसज्ज क्रिडांगणाचे बांधकाम व प्रदूषण नियंत्रक सयंत्र तात्काळ बसवण्यासह सीएसआर निधी खर्च करत असताना ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेवून नियोजन करावे असे कंपणी प्रशासनाला निर्देश दिले.

 

नियोजन बैठकीला अ.भा.सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, नांदा गावचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, आवाळपूरचे सरपंच प्रियंका दिवे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे, हिरापूरचे सरपंच सुनीता तुमराम, उपसरपंच अरुण काळे, सांगोळाचे माजी सरपंच सचिन बोंडे, भोयेगावचे सरपंच शालिनी बोंडे, बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट, नोकरीचे सरपंच संगीता मडावी, पत्रकार रवी बंडीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

कंत्राटी कामगारांचे मांडले प्रश्न..

दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराच्या वेतना बाबतचा प्रश्न सरपंच संघटनेने मांडला. 120 रुपये दर दिवसाच्या रोजीत वाढ करावी ही प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी कामगार कल्याण आयुक्त यांच्या सोबत बैठक बोलावून सदर मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल, असे शिष्टमंडळाला सांगितले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!