विद्युत रोहित्र जळाला तर करा हे काम – चंद्रपूर महावितरण

News34 chandrapur

चंद्रपूर : ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्याजागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. परंतु ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडलस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

 

गावातील ट्रान्सफॉर्मर जळाला तर विद्युत पुरवठा खंडित होऊन गावकऱ्यांची गैरसोय होते. जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरूस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरूस्त ट्रान्सफॉर्मरचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत. ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालयस्तरावर दररोज घेण्यात येतो.

 

या मोहिमेला यश आले असून महावितरणला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येत आहे. तथापि, ट्रान्सफॉर्मर जळाला आहे हेच उशीराने समजले तर प्रत्यक्षात वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी वीजग्राहकांनी महावितरणला मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रान्सफॉर्मर जळाल्याची तक्रार करण्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील वीजग्राहकांना चंद्रपूर मंडळ कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना ७८७५७६१००८ या क्रमांकावर माहिती देता येईल. तथा याच व्हॉट्स ॲप क्रमांकावर जळालेल्या ट्रान्सफॉर्मरचा फोटो व ठिकाणाचा तपशील कळविता येईल.

 

जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवून लवकरात लवकर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याच्या महावितरणच्या मोहिमेस वीजग्राहकांनी सहकार्य करावे आणि ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहिती द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!