Monday, June 17, 2024
Homeक्रीडाअरविंदो रियालीटी कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी २५ - ३० लक्ष मोबदला व स्थायी...

अरविंदो रियालीटी कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी २५ – ३० लक्ष मोबदला व स्थायी नोकऱ्या तसेच त्वरित पुनर्वसन देखील करा

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मांडली लक्षवेधी

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अरविंदो रियालीटी कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी २५ – ३० लक्ष निधी मोबदला मिळावा, स्थायी नोकऱ्या तसेच त्वरित पुनर्वसन देखील करा, या मागणीकरिता लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, अरविंदो रियालीटी कंपनीला केंद्र सरकार व्दारे एकुण ९३६ हेक्टर आर जमिन ही कोळसा खाणीकरिता अलॉट करण्यात आलेली आहे. त्यापैकी 128 हेक्टर आर शेतजमिन अरविंदो रियालीटी कंपनीला केंद्र सरकारच्या स्पेशल प्रोव्हिजन अॅक्ट 2015 अन्वये हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. व उर्वरीत 808 हेक्टर आर जमिन संपादीत करावयाची आहे.

 

याबाबत आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, उर्वरीत 808 हेक्टर जमिन संपादीत करत असतांना शेतकरी व गावक-यांमध्ये समन्वय साधुन त्यांना त्यांच्या मागणीनुसार शेतजमिनीचा २५ – ३० लक्ष रुपये एकरी मोबदला व कंपनीमध्ये स्थायी नोकरी मिळालीच पाहिजे हि आमची आग्रही मागणी आहे.

 

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अरविंदो कंपनीकडून सेंट्रल कॉलरी कंपनी नागपूर (डागा) या आस्थापनेवर जुने प्रकल्पग्रस्त 16 कामगार कार्यरत होते, आमच्या मागणी नुसार त्यांना स्थायी नोकरीत सामावुन घेतले व सानुग्रह मदत म्हणुन प्रत्येकी 7 लाख रूपये दिल्याबद्दल कंपनीचे कौतुक केले.

 

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, सदर प्रकल्पात बेलोरा या गावची संपुर्ण शेतजमिन संपादीत होत असल्याने बेलोरा गावाचे पुनर्वसन तात्काळ करण्यात यावे व त्यासंदर्भाने पुनर्वसन करार करण्यात यावा.

 

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या या मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून शेतकऱ्यांना लाभ होईल अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!