Friday, June 14, 2024
Homeक्रीडासर्वांगीण विकासात चंद्रपूर जिल्हा राज्यात आदर्श ठरावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा...

सर्वांगीण विकासात चंद्रपूर जिल्हा राज्यात आदर्श ठरावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी उत्कृष्ट आराखडा तयार करण्याच्या सूचना

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – जिल्ह्याच्या सर्वंकष विकासामध्ये जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षण सुविधा, पर्यावरण, अंगणवाडी, रस्ते आणि स्मशानभूमी यासह विविध बाबींचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रांमध्ये विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात मॉडेल ठरावा, यासाठी उत्कृष्ट आराखडा तयार करता येईल, अशा सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी (दि.21) दिले.

 

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना नियामक परिषदेची सभा नियोजन भवन सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते.  बैठकीला विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सर्वश्री कीर्तीकुमार भांगडीया, सुभाष धोटे, रामदास आंबटकर, श्री. शिंदे, किशोर जोरगेवार, प्रतिभा धानोरकर, डॉ. मनीषा कायंदे, सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

 

जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण सुविधा, अंगणवाडी, रस्ते, पाणीपुरवठा  व पायाभुत सुविधा या बाबींना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘नियमानुसार वार्षिक आराखडा तयार करून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पाणी पुरवठा आणि रोजगार या विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे.

 

पिण्याच्या पाण्याच्या 1302 योजना कार्यान्वित केल्या आहेत. पण आता जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा विकसित करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधा उदा. वॉल कंपाऊंड, वर्गखोली, सोलर सुविधा, खेळासाठी मैदाने, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह यासाठी दोन वर्षाचा वार्षिक आराखडा तयार करावा. मनपा व 17 नगरपरिषदेच्या शाळा व अंगणवाड्या उत्तम कराव्यात. गावातील स्मशानभूमी पूर्णत्वास नेता येईल. प्रदूषण व वैद्यकीय सोयी सुविधांमध्ये भेदभाव होता कामा नये. सूक्ष्म नियोजन करून दोन वर्षाचा  आराखडा तयार करण्यात येईल. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, रुग्णालय, रस्ते स्मशानभूमी आदी कामे करता येतील. तसेच “मिशन जय किसान” अंतर्गत शेतीशी निगडित कामे देखील करण्यात येणार आहेत.

 

पालकमंत्री श्री .मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘आपला जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे जावा यासाठी जिल्ह्यामध्ये 5001 किलोमीटरचे पाणंद रस्ते करण्यात येत असून देशात जिल्हा पाणंद रस्त्याच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर राहील, असेही ते म्हणाले. पर्यावरणासाठी योजना आखण्यात येत असून तेलंगणा राज्याने ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्येनुसार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यात देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून अमृत वृक्ष योजना राबविण्यात येईल. यासाठी जिल्हा परिषदेने जागा तपासाव्यात.

 

जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघाच्या विकासासाठी नियमाच्या चौकटीत व शास्त्रशुद्ध पद्धतीने निधी वितरित केला जाईल. यासाठी विधानसभा सदस्यांना प्रत्येकी  15 कोटी तर विधानपरिषद सदस्यांना प्रत्येकी 5 कोटी असे एकूण 130 कोटी निधीचे वितरण करण्यात येईल. त्यासोबतच, 80 कोटी रुपये कॅन्सर हॉस्पिटल व  प्रादेशिक पाणीपुरवठयाच्या सोलरकरिता 20 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!