News34 chandrapur
चंद्रपूर – गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ‘शरद सुरेश जोगी’ यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘J-पॅलेस’ नामक बार & रेस्टॉरंट,लॉजचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून जोगी यांनी खोटे शिक्के व खोट्या सह्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करत सदर बारचा परवाना मिळवल्याची तक्रार संबंधित विभागाकडे करून परवाना रद्द करावा आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यापुर्वी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी, कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार ‘गणेश लोंढे’ यांनी जोगी यांना संपर्क केला असता फोनवर प्रतिक्रिया देत नाही,प्रत्यक्ष भेट मग देतो.!असे बोलून ‘J-पॅलेस’ बार मध्ये बोलवले.
दुरध्वनीवर प्रतिक्रिया देत नसल्याने साध्या मनाने गणेश लोंढे सदर बारमध्ये गेले असता त्याठिकाणी पत्रकार गणेश यांनी प्रतिक्रिया विचारताच जोगी यांनी अश्लील शिवीगाळ करत ‘तु भला मोठा पत्रकार झाला का ? माझी सत्ता आहे,पाहून घेतो तुमच्या सारख्या पत्रकारांना, असे म्हणत पत्रकार गणेश यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जोरात जमिनीवर आपटला,खुर्ची उचलून मारली आणि उद्या जर बातमी आली तर तुला मारून टाकतो’, अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली.यात पत्रकार गणेश यांना गुप्त मार बसला आहे.
जोगी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन यांनी शिष्टमंडळासहित पोलीस अधिक्षकांची भेट घेतली, यावेळी घडलेला सर्व प्रकार लोंढे यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितला, कारवाई होणार असे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पोलीस अधीक्षकांनी दिले.
जर जोगी यांच्यावर कारवाई झाली नाही तर सत्तेचा माज असलेल्या नेत्याविरोधात ग्रामीण पत्रकार संघटना आक्रमक होत एकजुटतेने याविरोधात आंदोलन करणार असा इशारा सोलापन यांनी यावेळी दिला.