News34 chandrapur
चंद्रपूर : शहरातील बालाजी वाॅर्ड गोपालपुरी, आनंदनगरात मागील अनेक वर्षांपासून खुले असलेल्या सुमारे दोन एकर भूखंडांवर बेकायदेशीर लेआउट तयार करण्यात आला. त्यामध्ये नियमानुसार रस्ता व सार्वजनिक कामांसाठी ओपन स्पेस ठेवला नाही. त्यामुळे हा लेआउट रद्द करावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मंगळवारी (दि.१२) महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांच्याकडे तक्रारीतून केली आहे.
गोपालपुरी, आनंदनगरातील ही जागा ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्याला लागून आहे. त्यामुळे किल्ल्याच्या वैभवाला धोका निर्माण होऊ शकतो. या जागेत दरवर्षी इरई नदीच्या पुराचे पाणी शिरते. या जागेवर राऊत कुटुंबीय, तसेच इतर संबंधितांनी नुकतेच लेआउट तयार केले. १०० रुपयांच्या नोटरीवर प्लॉट विक्री सुरू केल्याने विकत घेणाऱ्या नागरिकांची फसवणूक होत आहे.
या लेआउटमध्ये फक्त १८ फूट रुंद रस्त्यासाठी जागा सोडण्यात आली. नियमानुसार नाली, ओपन स्पेस आणि समाज मंदिरासाठी जागाच ठेवली नाही. बांधकामे उभी झाल्यास येणाऱ्या काळात तेथील नागरिकांची गैरसोय होणार असून, महानगरपालिकेचीही फसवणूक होणार आहे. त्यामुळे हे लेआउट रद्द करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी तक्रारीतून केली आहे.