Monday, June 24, 2024
Homeक्रीडामुंबई पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ऑर्डर कधी देणार - आमदार सुलभा...

मुंबई पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ऑर्डर कधी देणार – आमदार सुलभा खोडके

अमरावती जिल्ह्यातील हजारो उमेदवारांच्या पोलीस भरतीचा प्रश्न विधानसभेत गाजला

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

नागपूर :- दोन वर्ष उलटून सुद्धा वर्ष २०२१-२०२२ मधील मुंबई पोलीस भरतीमधील प्रतीक्षा यादीतील हजारो उमेदवार नियुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनावर आंदोलन पुकारले असता अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी विधान भवनात प्रश्न उपस्थित करून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांची वैद्यकीय पडताळणी करून त्यांना पोलीस सेवेत भरती करण्याची मागणी सभागृहा समक्ष लावून धरली.

 

मुंबई पोलीस भरतीमधील निवड यादीतील हजारो उमेदवार हे नागपूर अधिवेशनावर आंदोलनाला बसले असून यात अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेत अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला.

 

गृह विभागात भरपूर प्रमाणात रिक्त पदे असतांना सुद्धा पोलीस भरती होत नसल्याने पोलीस विभागावर कामाचा ताण येत आहे. मुंबई पोलीस दलात तब्बल २६ हजार पर्यंत शिपाई पदे रिक्त आहेत. त्यापैकी पोलीस विभागाने १० हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला होता , मात्र ७०७६ पदांची भरती राबविली म्हणजे ७० टक्के पदांची भरती प्रक्रिया राबविली गेली . हि भरती प्रक्रिया १०० टक्के नसून त्यामध्ये अजूनही ३ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत . तसेच त्यावेळी प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांची कागद पत्रे पडताळणी व पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात आले . परंतु त्यांना अजूनही नियुक्ती देण्यात आली नसून त्यांची वयोमर्यादा संपत असल्याने त्यांना नियुक्तीची प्रतीक्षा लागली आहे. याबाबत आमदार महोदयांच्या वतीने सभागृहाला अवगत करून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री -देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले.

 

तसेच वर्ष २०२२ व २०२३ मधील पोलीस भरतीतील अजूनही पदे रिक्त असल्याने मुंबई पोलीस दलावर खूप ताण निर्माण होत आहे. हा ताण कमी करण्यासाठी मुंबई पोलीस भरती २०२१ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा निवड यादीत समावेश करून त्यांना संधी देण्यात यावी , जेणेकरून उमेदवारांना न्याय मिळेल व पोलीस दलावरील ताण कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे मुंबई पोलीस भरती २०२१ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती कधी देणार ? व त्यांची पोलीस भरती कधी करणार ? असा प्रश्न आमदार महोदयांच्या वतीने सभागृहात उपस्थित करण्यात आला.

 

यावर सभागृहासमक्ष उत्तर देतांना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की , ज्यांची निवड झाली आहे ,त्यांची वयोमर्यादा संपणार नाही , प्रशिक्षणाची क्षमता आपण वाढवत असून एक -एक बॅच आपण तयार करून प्रक्रिया पूर्ण करत आहोत . मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णया प्रमाणे प्रतीक्षा यादी एका वर्षाच्या वर राहत नसल्याने त्यांना घेता येत नाही . मात्र ज्यांची थेट निवड झाली त्यांना चिंता करण्याची गरज नसून त्यांना शंभर टक्के नोकरी मिळणार असल्याचे गृहमंत्री महोदयांनी सभागृहात स्पष्ट केले.

 

तसेच मुंबई पोलीस भरती २०२१-२२ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे कागदपत्राची तपासणी झाली असल्याने त्यांचे वैद्यकीय पडताळणी करून पोलीस विभागात संधी देण्याच्या मागणीचे पत्र सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले. यावर सर्व बाबीने पडताळणी व तपासणी करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन उमुख्यमंत्रीमहोदयांच्या वतीने देण्यात आले .

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!