News34 chandrapur
चंद्रपूर – डिजिटल युगात गुन्हेगारी सुद्धा आधुनिक झाली आहे, आज गुन्हेगारीच्या युक्तीला तोड नसल्याचे दिसत आहे, ती गुन्हेगारी ऑनलाइन असो की ऑफलाईन, असाच एक गुन्हा चंद्रपुरात घडला, स्थानिक गुन्हे शाखेने अश्याच एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.
नागरिकांच्या नावावर फायनान्स ने दुचाकी वाहन खरेदी करीत ते वाहन दुसऱ्या व्यक्तीला विकण्याचा गोरखधंदा तीन युवकांनी सुरू केला होता, मात्र स्थानिक गुन्हे शाखेमुळे हे घबाड पुढे आले.
असे होते गुन्हेगारीचे स्वरूप
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे राहणारा आरोपी क्रमांक 1 आशिष सहारे व त्याचे सहकारी आरोपी 2 मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील पवन साहू, आरोपी क्रमांक 3 संदीप कनासिया बालाघाट मध्यप्रदेश येथे राहणारे हे तिघेजण एकमेकांचे मित्र, तिघांनी मिळून नव्या गुन्ह्याची योजना आखली.
नागभीड येथे राहणारा आशिष सहारे याने गावातील गरीब नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढणे सुरू केले, यामध्ये नारायण पर्वते यांच्या नावावर चारचाकी वाहन घेतले, पर्वते यांचे सर्व कागदपत्रे सोबत घेत त्यावर कर्ज सुद्धा घेतले, आणि नंतर तेच वाहन दुसऱ्याला विकले, वाहन घेणाऱ्याला त्या वाहनांचे कागदपत्रे मिळाले नाही.
काही दिवसांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पर्वते यांच्याकडून वाहनांचे हफ्ते मागायला आले, मात्र मी वाहन घेतले नाही असे त्यांनी सांगितले, नंतर फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व माहिती पर्वते यांना दिली, आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच याबाबत पोलीस तक्रार करण्यात आली.
गुन्ह्याची गंभीरता बघता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्याकडे वर्ग केला.
स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पथक गठीत केले, सखोल तपास केल्यावर यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने 1 स्कॉर्पिओ, 1 ट्रॅक्टर व 14 दुचाकी असे तब्बल 16 वाहने किंमत 32 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक करीत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 420 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी याबाबत जनतेला आवाहन केले की वाहन खरेदी करताना शोरूम मधून वाहनाची सखोल माहिती घ्यावी, कागदपत्रांची पडताळणी करावी, वाहन मिळवून देतो असे कुणी सांगितले तर पुढील व्यक्तीला आपली कागदपत्रे देऊ नका, त्यासंबंधाने कुणी आपल्याकडे आले की जवळच्या पोलीस स्टेशनला याबाबत माहिती द्यावी.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सपोनि नागेशकुमार चतरकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी दीपक डोंगरे, गणेश भोयर, संजय वाढई, गोपीनाथ नरोटे, सतीश बगमारे, प्रदीप मडावी व सायबर पोलिसांनी केली.