मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळेच नदी पुनरुज्जीवन कामाला गती – जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

News34 chandrapur

चंद्रपूर  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्राचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्यातील 75 नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला. याअंतर्गत त्यांनी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबवून गावागावात नद्यांचे संरक्षण, संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली. विशेष म्हणजे याबाबत ना. मुनगंटीवार यांनी आमच्यासोबत चर्चा केल्यानंतर केवळ 20 दिवसात जलसाक्षरता अभियान राबविले व नद्यांच्या संवर्धनासाठी चार महिन्यात चार शासन निर्णय काढून या कामाला गती दिली, असे गौरवोद्गार प्रसिध्द जलतज्ज्ञ तथा रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी काढले.

 

वन अकादमी येथे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच प्रसिध्द जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत ‘चला जाणूया नदी’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील उमा व इरई नदी संवर्धनाबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी डॉ. राजेंद्र सिंह बोलत होते. बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपजिल्हाधिकारी अजय चरडे, प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, डॉ. प्रवीण महाजन, नरेंद्र चूग, रमाकांत कुलकर्णी, राहुल गुळघाणे, अजय काकडे आदी उपस्थित होते.

 

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी श्री.ना.सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येक जिल्ह्यातून समोर आलेले जलदूत, जलनायक, जलसेवक, जलप्रेमी आदींची फळी तयार केली, असे सांगून डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळाले तेव्हा आपल्या देशातील नद्या अमृतवाहिनी होत्या. त्या शुध्द, अविरल आणि निर्मळ वाहत होत्या. म्हणजेच आपल्या नद्यांमधून अमृत वाहत होते. मात्र आता आपल्या नद्यांची अतिशय दैननीय अवस्था झाली आहे. त्यामुळेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या नद्या पूर्ववत अमृतवाहिनी होण्यासाठी श्री. मुनगंटीवार यांनी नद्यांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली आहे.

 

पुढे डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, पुरातन काळात नद्यांच्या आजुबाजुला आपली संस्कृती विकसीत झाली आहे. तसेच आपल्या देशातील 99 टक्के नद्यांचा उगम हा वन जमिनीतून होतो. आज श्री. मुनगंटीवार यांच्याकडे सांस्कृतिक कार्य आणि वनविभाग हे दोन्ही महत्वाचे विभाग आहेत. त्यामुळे वन विभागाने पुढाकार घेऊन नद्यांची सद्यपरिस्थती जाणून घेण्यासाठी अभ्यास दौरा करून नदीला शुध्द, अविरल आणि निर्मळ करावे. त्यामुळे पूर नियंत्रण आणि दुष्काळमुक्त करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

 

ईश्वरीय काम होत असल्याचा आनंद – ना.सुधीर मुनगंटीवार

प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह आणि त्यांच्या टीमकडून नदी संवर्धनाचे मोठे कार्य होत आहे. हे एक ईश्वरीय कार्य असून या पवित्र कार्यात आपणही सहभागी आहोत, याचा मनापासून आनंद आहे, असे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

 

पुढे ते म्हणाले, ‘मिशन अमृत’ प्रत्येक जिल्ह्यातील एक नदी मॉडेल म्हणून विकसीत करण्यात येईल. यात नदीची संपूर्ण माहिती, उगम आणि संगम स्थळावरील माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध होईल, असे नियोजन करावे. तसेच नागपूरच्या नीरी या संस्थेमार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत करावे. नदी संवर्धनासाठी शासन आपल्या पाठीशी आहे.

 

नदी संवर्धनासाठी वेगवेगळ्या पध्दतीने कार्य करणारे प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर, आमीर खान, जगतगुरू जग्गी वासुदेवन व इतर मान्यवरांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी एक पोर्टल तयार करून नद्यांबाबतची संपूर्ण माहिती यात असावी. नद्यांचे संवर्धन, संरक्षण व नियोजनाबाबत लवकरच मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल. पर्यावरण, नदी संवर्धन यासाठी राज्य आणि केंद्राच्या कायद्यांचा अभ्यास करून यासाठी समितीचे गठण करण्यात येईल, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

 

यावेळी जिल्ह्यातील उमा आणि इरई नदीचा विकासाचा आराखडा सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विक्रांत जोशी यांनी केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!