News34 chandrapur
नवी दिल्ली/चंद्रपूर – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत नागरी समाज संघटना आणि जनआंदोलनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर शनिवारी देशभरातील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.
बैठकीत, सर्व प्रतिनिधींनी विशेषतः राहुल गांधी यांच्याशी ओबीसींची जातनिहाय प्रगणना, सर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्यासाठी घटनादुरुस्ती लागू करणे यासारख्या विविध प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा केली. दीड तासाहून अधिक काळ चाललेल्या चर्चेत राहुल गांधी यांनी हे प्रश्न सोडवण्याची कटिबद्धता व्यक्त केली. देशातील ओबीसी समाजातील 70 कोटी लोक कर म्हणून जीएसटी भरतात, मात्र त्या तुलनेत त्यांना त्यांचा वाटाही मिळत नसल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळेच हा समाज त्याच जागी अडकून राहिला आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे सर्व परिस्थितीत ओबीसींची जात जनगणना करण्याचा मुद्दा गांभीर्याने घेत त्यांनी याबाबत आपली कटिबद्धता दर्शवली.
बैठकीत विविध राज्यातील ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली, जी राहुल यांनी लक्षपूर्वक ऐकली. बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही.ईश्वारय्या, सामाजिक क्रांती आघाडीचे अध्यक्ष न्यायमूर्ती वीरेंद्रसिंग यादव, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, हंसराज जंगीड , अमेरिका मधून आलेले हरी ईपन्नापली, संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक प्राध्यापक अनिल यादव, बीसी वेलफेअर अशोसीएशन तेलंगाणाचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, प्रा सुरज मंडल, प्रा सुधानशू ,विभा पटेल, डॉ विजय भास्कर यांच्यासह एकूण देशातील 37 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.