News34 chandrapur
चंद्रपूर : वर्क फ्राम होमच्या नावाखाली घुग्घूस येथील मायलेकीसह जिल्हाभरातील साडेचारशेवर नागरिकांना एका ऑनलाइन कंपनीने गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित युवतीने घुग्घूस पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात फसवणूक करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित युवती आणि भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घूस येथील शुभांगी जीवने ही युवती रोजगाराच्या शोधात होती. तिने गुगलवर रोजगारासंदर्भात शोध घेतला. इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा वापरही तिने रोजगार शोधण्यासाठी केला. दरम्यान, काही दिवसानंतर तिच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक आली. ACCIBIS Hotel online Rating या कंपनीचा संचालक असल्याचे सांगत चंदर सिंग नामक भामट्याने युवतीशी संपर्क करून संबंधित कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळले असे आमिष दाखविले.
ही नेटवर्क कंपनी असून, स्वत:च्या आयडी अंतर्गत अन्य लोकांना कंपनीशी जुळविल्यास अतिरिक्त बोनस मिळेल असे सांगण्यात आले. युवतीने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. यानंतर तिला रिटर्न पैसे मिळू लागले. यानंतर तिने स्वत:ची आई, बहिणीसह काही मित्र, मैत्रिणींनाही या कंपनीशी जोडले. यानंतर नेटवर्क वाढत जाऊन साडेचारशे जणांचे हे नेटवर्क झाले. पीडित युवतीला सुरुवातीला दीड लाखापर्यंत तर तिच्या आईला एक लाखापर्यंतचे रिटर्न मिळाल्याने पीडितेने साडे सात लाख रुपये यात गुंतविले होते. यानंतर अनेकांनी दहा ते २० हजार तर काही ५० हजारापर्यंत रक्कम या कंपनीत गुंतविली आहे.
सुरुवातीला कंपनीने रिटर्न दिले. मात्र, मागील काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना रिटर्न येणे बंद झाले. गुंतवणूकदारांच्या आभासी आयडीवर रकमा जमा होत होत्या. मात्र, ते पैसे काढता येत नव्हते. पीडितेसह काही गुंतवणूकदारांनी चंदर सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्याचा भ्रमणध्वनी बंद दाखविला जात आहे. कोणताही संपर्क होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने घुग्घूस पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. परंतु, घुग्घूस पोलिसांनी चंद्रपुरातील सायबर गुन्हे शाखेत तक्रार देण्यास सांगितले. यानंतर शुक्रवारी त्यांनी सायबर गुन्हे शाखा गाठून तेथेही तक्रार दिली. परंतु, सायबर गुन्हे शाखेने परत त्यांना संबंधित पोलीस ठाण्यातच तक्रार देण्यास सांगितल्याने न्याय कुणाकडे मागयचा असा प्रश्न पीडितेसह गुंतवणूकदारांनी उपस्थित केला आहे.
ऑनलाइन फसवणुकीच्या संदर्भात देशात कोणतेही कठोर कायदे नाही. याचाच फायदा भामटे घेत असून, बनावट कंपन्यांच्या माध्यमातून रोज लाखो लोकांना ऑनलाइन गंडविले जात आहे. अशा प्रकारासाठी केंद्र सरकार जबाबदार असून, देशात ऑनलाइन फसवणुकीविरुद्ध कठोर कायदे करण्याची आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी भूषण फुसे आणि पीडित गुंतवणूकदारांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.