News34 chandrapur
चंद्रपूर – लोकप्रतिनिधी म्हणजे जनता व प्रशासन यामधील दुवा आहे. जनसेवकाने सामान्य नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहावे. जनतेने दाखविलेला विश्वास याला जाऊ देता जनतेच्या विश्वासावर खरे उतरणे व जनतेला दिलेल्या अभिवचनाची पूर्तता करणे हेच आमचे आद्य कर्तव्य असून नागरिकांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथील भूती नाल्यावर उंच फुलाचे बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
आयोजित भूमिपूजन सोहळ्यास उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार ,ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकरजी शेलोकर ,काँग्रेस युवक विधानसभा अध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी, सरपंच दौलत ढोंगे, उपसरपंच सोनाली सूर्यवंशी, अनुसूची जाती सेल अध्यक्ष प्रमोद मोटघरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ब्रह्मदेव दिघोरे,पोलीस पाटील उसलवार, ग्रा. प .सदस्य ज्योती ढोंगे ,वैशाली राऊत, मिसार , दिघोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शनपर बोलताना तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके यांनी विरोधी पक्षनेते तथा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या सोयी सुविधांची माहिती देत नागरिकांच्या दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्यांना पूर्णविराम देणे हेतू राबविण्यात येणाऱ्या विजयदूत या संकल्पनेची परिपूर्ण माहिती उपस्थित ग्रामवासी यांना दिली. तर विरोधी पक्षनेते तथा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचे कार्य व तत्परता तसेच नागरिकांप्रति असणारी सेवाभावी वृत्ती यावर प्रकाश टाकत माजी जि. प. सदस्य डॉ. राजेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनपर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पावसाळ्यात बेटाळा गावाच्या भूती नाल्यावरील पूल पूर्णतः पाण्याखाली येऊन गावाचा संपर्क तुटतो अशातच गेल्या अनेक वर्षात अनेकांच्या शेळ्या, गाय, बैल, गोधन व पशुधन वाहून गेले. सोबतच पुराच्या पाण्यात माणूसही वाहून गेल्याची दुर्दैवी घटना येथे घडली आहे. अशातच मी मंत्री असताना विशेष बाब अंतर्गत अर्थसंकल्पात सदर पुलाकरिता 9.5 कोटी निधी मंजूर करून घेत उंच पुला बांधकामकरिता प्रशासनाकडून मंजुरी मिळवून घेतली. तसेच बेटाळा येथे समाज सभागृह, नवीन अंगणवाडी बांधकाम, सिमेंट रस्ते नाल्या व नागरिकांच्या मूलभूत सुविधांना घेऊन विशेष अशा योजना मंजूर करून दिल्या. जनतेच्या प्रमुख समस्या सोडविणे हे लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य असून दिलेल्या अभिवचनाची पूर्तता हीच आमची ओळख आहे.असे ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नवीन पुलाचे बांधकाम नवीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण तसेच विजय भाऊ सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी प्रामुख्याने बहुसंख्य बेटाळावासी नागरिक व महिला उपस्थित होते.