Cultural Festival : मूल येथे झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सव

News34 chandrapur

गुरू गुरनुले

मूल – महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक कार्य महासंचालनालय मुंबई व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व चंद्रपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनात मूल येथे दिनांक १८,१९ व २० फेब्रुवारीला झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

या तीन दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मांदीयाळी रंगणार आहे. झाडीपट्टीतील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टी कलाकार यात भाग घेणार आहेत. विकास पुरुष नाम. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुयोग्य नेतृत्वात व मार्गदर्शनात हा झाडीपट्टी महा महोत्सव पार पडणार आहे.

 

 

झाडीपट्टीतील जेष्ठ कलावंत पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या मार्गदर्शनात व नाट्य कलावंत सदानंद बोरकर, देवेंद्र दोडके,मुकेश गेडाम, शेखर डोंगरे, अनिरुद्ध वनकर, युवराज प्रधान, युवराज गोंगले,अरविंद झाडे यांच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कला रसिकांना मिळणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या झाडीपट्टी महामहोत्सवात नाटक, दंडार, खडीगंमत, रेला नृत्य,आदिवासी नृत्य, कीर्तन, भुलाबाईची गाणी, रोवण्याची गाणी, महादेवाची गाणी, डहाका, संबळ, सुमधुर सुगम संगीत आदी कार्यक्रम या महोत्सवात सादर केले जाणार आहेत.

 

दिनांक 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या पर्वावर मूल शहरातून सांस्कृतिक महोत्सवानिमित्त रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत नाम. सुधीर मुनगंटीवार,सिने कलावंत, सिने अभिनेत्री आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या रॅलीत विविध नेत्रदीपक देखावा सादर केल्या जाणार आहेत. तीन दिवस चालणारे या सांस्कृतिक महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मूल येथील झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सव समितीने केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!