Thursday, May 23, 2024
Homeग्रामीण वार्ताShetkari Sanghatana : राजुरा उपविभागीय कार्यालयावर धडकला शेतकरी संघटनेचा भव्य मोर्चा

Shetkari Sanghatana : राजुरा उपविभागीय कार्यालयावर धडकला शेतकरी संघटनेचा भव्य मोर्चा

शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य हेच स्वप्न - ॲड.वामनराव चटप

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

राजुरा – शेेतक-यांच्या अनेेक ज्वलंत मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चाद्वारे येऊन आज ३ फेब्रुवारीला राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयाला धडक दिली. कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांच्या आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरूध्द जोरदार घोषणा देत आपला आवाज बुलंद केला. उपविभागीय कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. आज निघालेला शेतकरी संघटनेचा मोर्चा लक्षवेधी ठरला. Shetakari Association

 

यावेेळी केलेल्या भाषणात माजी आमदार ॲड.वामनराव चटप म्हणाले की, सरकार शेतमाल निर्यातीवर विविध बंधने लादून शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य देत नाही. सतत आश्वासने दिली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही. सरकार शेतकऱ्यांची अनेक मार्गाने लूट करीत असून त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही अत्यंत वेदना देणारी बाब असून जगाच्या पोशिंद्याची ही स्थिती सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिपाक आहे. म्हणून शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य हेच स्वप्न असून त्यासाठी आक्रमकपणे प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड.वामनराव चटप यांनी केले. या सभेत ॲड.दिनेश शर्मा, सतिश दाणी यांचेसह अनेक पदाधिका-यांची भाषणे झाली.

 

या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप, स्वभापचे माजी प्रांताध्यक्ष ॲड.दिनेश शर्मा, सतिश दाणी, अरूण पाटील नवले, निळकंठ कोरांगे, सुनिल बावणे, शेषराव बोंडे, कपील इद्दे, प्रभाकर ढवस, विनोद बारसिंगे, हरिदास बोरकुटे, कवडू पोटे, रमेश नळे, मधुकर चिंचोलकर, दिलीप देठे,सुरेश आस्वले, डॉ.गंगाधर बोढे, नरेंद्र काकडे, मारोती लांडे, नरेश गुरनुले,नरेंद्र मोहारे, मनोज मुन, सतय्या रामगिरवार, प्रफुल कावळे, उत्पल गोरे, सुरज गव्हाणे, सुरज जीवतोडे, प्रभाकर लडके,विलास कोदिरपाल,पांडूरंग पोटे, यांचेसह अनेक पदाधिका-यांनी केले.

 

हा मोर्चा भवानी मंदीर प्रांगणातून निघून शहरातून तहसिल कार्यालयावर गेला. तेथे शिष्टमंडळाने मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पाठविण्यासाठी एसडीओ रविंद्र माने यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

 

मागण्या

सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे म्हणून सक्तीची कर्जवसुली बंद करून संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा व दिवसाचे लोडशेडींग बंद करावे, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी, इतर वन्य प्राण्यांप्रमाणे सर्पदंशाने मृत्यु धारकांचे वारसदारांना आर्थिक मदत देण्यात यावी, पीक विम्यात होणारी शेतक-यांची फसवणूक बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी.

 

 

पिक विमा मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड मध्ये धानाला हभीभावा पेक्षा ४०% जास्त भाव देवून तर मध्यप्रदेशाात गव्हाला हमी भावापेक्षा ३०% जास्त भाव देवून खरेदी करण्याची “मोदी गॅरंटी” ची घोषणा केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कापूस व सोयाबीन ला हमीभावापेक्षा ३०% जास्त दर देवून खरेदी करावी तसेेच ज्यांनी विक्री केली आहे, त्यांना वाढीव रक्कम द्यावी, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती तातडीने करावी, वन हक्क कायद्यात वन जमिनीवर अतिक्रमण असणाऱ्या शेतकऱ्यांना पट्टा देतांना असलेली तीन पिढ्यांची व २५ वर्षाची एक पिढी या अटी वनहक्क कायद्यातून वगळण्यात याव्या, जीवती येथे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी तथा व्यवहार न्यायाधीश (कनिष्ठस्तर) न्यायालयाची तात्काळ निर्मिती करण्यात यावी.

 

 

बल्लारपूर-सुरजागड व गडचांदूर-आदिलाबाद या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा,बल्लारपूर-आष्टी-आलापल्ली -सुरजागड या राज्य मार्गाचे भाग आष्टी ते आलापल्ली- सुरजागड मार्गाचे सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करण्यात यावे, जबरानजोत शेतकऱ्यांना तात्काळ पट्टे वितरित करण्यात यावे, सास्ती गावातील शिल्लक राहिलेली १६% जमीन व विरूर (गाडेगांव) गावातील शिल्लक राहिलेली जमीन वेकोलीने तात्काळ भुसंपादीत करावी, गडचिरोली जिल्ह्यात मद्य / दारू निर्मितीचा कारखाना सुरू करण्यात येवु नये, अन्न धान्यावरील जी.एस.टी. रद्द करण्यात यावी, स्थानिक बेरोजगारांना कंपनीत तथा खाणीत सामावून घेण्यात यावे अशा एकुण १७ मागण्या शेतकरी संघटनेने मोर्चाद्वारे केल्या आहेत.
या मोर्चात राजुरा तालुक्यातील शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्ष यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चात महिलांची संख्या लक्षणिय होती. या मोर्चाने शेतकरी संघटनेने पुन्हा रणशिंग फुंकले आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!