सिंदेवाही: Sirkala Contractor Theft Case अंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील सिरकाळा मामा तलाव बांधकाम ठिकाणी कंत्राटदाराच्या गाडीतून १ लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात ऑपरेटरनेच पैसे चोरून पलायन केल्याचा आरोप असून सिंदेवाही पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (इरई नदी खोलीप्रकरणात गैर प्रकारचा आरोप)
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील रहिवासी कंत्राटदार इंद्रकुमार महाजन उके यांचे सिंदेवाही तालुक्यातील सिरकाळा येथील मामा तलावावर मातीचे व तलावाचे बांधकाम सुरू आहे. या कामावर भोजू यादव (रा. बामोर कला, जि. अशोक नगर, मध्यप्रदेश) हा युवक गेल्या १२ एप्रिल २०२६ पासून मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता. (चंद्रपुरात ५ मुलांचा नदीत बुडून मृत्यू)
Sirkala Contractor Theft Case बांधकामात घडलेली चोरीची घटना
१ जून २०२६ रोजी दुपारी २:०० वाजताच्या सुमारास कंत्राटदार उके हे आपल्या फॉर्च्युनर गाडीने (क्र. MH-34 BB-3399) बांधकाम पाहण्यासाठी आले होते. त्यांच्या गाडीतील एका हँड बॅगमध्ये १ लाख रुपयांची रोकड लॉक करून ठेवली होती. दरम्यान, भूक लागल्याने उके यांनी गाडीत ठेवलेला टिफिन आणण्यासाठी ऑपरेटर भोजू यादव याला गाडीची चावी दिली. भोजूने टिफिन आणून दिला, मात्र गाडीची चावी स्वतःकडेच ठेवून ‘जेवण करून येतो’ असे सांगून तो तिथून निघून गेला.
बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने उके यांनी त्याला फोन केला. त्याने ‘येत आहे’ असे सांगितले आणि त्यानंतर आपला मोबाईल बंद करून टाकला. संशय आल्याने उके यांनी गाडीत तपासणी केली असता, भोजू यादव याने गाडीतील हँड बॅग कापून त्यामधील १ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २ जून रोजी रात्री आरोपीने फोन करून पैसे परत करतो असे सांगितले, मात्र आजतागायत पैसे परत न केल्याने अखेर कंत्राटदाराने ८ जून रोजी सिंदेवाही पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून सिंदेवाही पोलिसांनी आरोपी भोजू यादव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी सतीश साळीकराम मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत उडाराम लांजेवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
