भद्रावती – भद्रावती शहरातून एक धक्कादायक (Bhadrawati Crime News) बातमी समोर आली आहे. शहरातील शास्त्रीनगर परिसरात बेकायदेशीरपणे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व खर्रा तयार करून विक्री केली जात होती. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी रविवारी दुपारी अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून हजारोंचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन जणांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (दुकानात घुसून चाकू हल्ला)
भद्रावती शहरातील शास्त्रीनगर परिसरात सुगंधित तंबाखू व खर्रा तयार करून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी रविवारी दुपारी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, खर्रा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर वस्तूंसह एकूण १३ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhadrawati Crime News : शास्त्रीनगर परिसरात बेकायदेशीर खर्रा कारखान्यावर धाड
पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार यांना गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहितीप्रमाणे, शास्त्रीनगर येथील प्रशिक हिरामन चहांदे हा आपल्या राहत्या घरी सुगंधित तंबाखू, सुपारी व इतर साहित्याचा वापर करून खर्रा तयार करीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पंचांसमक्ष घराची झडती घेतली असता तेथे मजा-१०८ कंपनीचे सुगंधित तंबाखूचे डबे, कापलेली सुपारी, चुना, तयार खर्रा व इतर साहित्य असा एकूण १३ हजार ९०५ रुपयांचा साठा आढळून आला.
चौकशीदरम्यान जप्त करण्यात आलेला सुगंधित तंबाखू व सुपारीचा माल वैभव लांडे याने खर्रा तयार करण्यासाठी पुरवल्याची माहिती प्रशिक चहांदे याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वैभव लांडे याचा शोध घेतला असता तो घरी आढळून आला नाही. पोलिसांनी जप्त केलेल्या मालाचे नमुने पंचांसमक्ष सीलबंद करून पुढील तपासासाठी पाठविले आहेत.
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व साठवणुकीवर बंदी घातलेली असतानाही दोन्ही आरोपींनी जनतेच्या आरोग्यास हानिकारक असलेला तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी बाळगल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. या प्रकरणी प्रशिक हिरामन चहांदे व वैभव लांडे यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






