Bramhapuri Crime scene at Ramdeo Baba Solvent Company

ब्रम्हपुरीत ट्रक चालकावर लोखंडी व्हीलपाण्याने जीवघेणा हल्ला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 8, 2026

चंद्रपूर: ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून (Bramhapuri Crime) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रामदेव बाबा साल्वंट कंपनीच्या परिसरात एका ट्रक चालकावर लोखंडी व्हीलपाण्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपीने चालकांमध्ये असंतोष पसरवत असल्याचा संशय घेतला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. (चंद्रपुरात ट्युशनला जाणारी मुलगी बेपत्ता)

Bramhapuri Crime: रामदेव बाबा साल्वंट कंपनीतील धक्कादायक प्रकार

गोविंदा धर्मा निर्मलकर (वय ३७, रा. महावीर कॉलनी, सीता राईस मिलच्या मागे, दुर्ग, छत्तीसगड) हे गेल्या २००७ पासून दुर्ग येथील जीटीसी (GTC) कंपनीच्या ट्रकवर चालक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते आपल्या ट्रकने रायपूर ते ब्रम्हपुरी येथील रामदेव बाबा साल्वंट कंपनीत कुकुस (राईस ब्रान) आणण्याचे काम करत आहेत. नेहमीप्रमाणे ४ जुलै २०२६ रोजी ते ट्रक घेऊन ब्रम्हपुरीत आले होते आणि ५ जुलै रोजी माल खाली केल्यानंतर त्यांचा ट्रक कंपनीच्या आवारातच उभा होता.

७ जुलै २०२६ रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास गोविंद निर्मलकर हे आपल्या ट्रकजवळ स्वयंपाक करत होते. त्याच वेळी त्यांच्या ट्रकच्या बाजूला यादव ट्रान्सपोर्ट कंपनीचा (दुर्ग) एक ट्रक उभा होता. यादरम्यान यादव ट्रान्सपोर्टचे मालक महेश यादव यांनी गोविंद यांच्याशी फोनवर संपर्क साधला. हा फोन कॉल संपल्यानंतर, बाजूच्या ट्रकचा चालक रवीकुमार विजयकुमार शर्मा (वय ३३, रा. पोलसाय पारा, बस स्टँडजवळ, वॉर्ड नं. २७, दुर्ग, छत्तीसगड) हा गोविंद यांच्याजवळ आला. “तू इतर ड्रायव्हर लोकांना भडकवतोस,” असा आरोप करत रवीकुमारने गोविंद यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपी रवीकुमारने थेट आपल्या गाडीतील लोखंडी व्हीलपाणा आणला आणि काहीही विचार न करता गोविंद यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात गोविंद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.

या घटनेनंतर रक्ताळलेल्या अवस्थेत जखमी चालक गोविंद निर्मलकर यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाणे गाठून तोंडी तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी चालक रवीकुमार विजयकुमार शर्मा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१) (घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे) आणि कलम ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद गोविंदराव बनबाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार होमराज बळीराम खोब्रागडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment