राजुरा : (Rajura Coal Mines Theft) प्रकरणात राजुरा पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत चोरीचा तपास लावला आहे. पवनी-२ कोल मायन्स परिसरातून चोरीला गेलेली १ लाख रुपयांची ॲल्युमिनियम तार हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन अट्टल आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. चोरीचा माल वाहून नेणारे ३० लाख रुपयांचे आयशर वाहनही जप्त केले आहे. पोलिसांनी एकूण ३१ लाख रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने अवघ्या दोन दिवसांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सुमारे ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पवनी-२ कोल मायन्स परिसरातून चोरीला गेलेली १ लाख रुपयांची ॲल्युमिनियम तार हस्तगत करण्यात आली असून, या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चोरीचा माल वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेले टाटा आयशर वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे. (घरात लपविला सुगंधित तंबाखू, रामनगर पोलिसांनी केली कारवाई)
Rajura Coal Mines Theft: पोलिसांनी लावला अवघ्या ४८ तासांत छडा
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोपटाळा कॉलनी येथील रहिवासी तथा पवनी-२ कोल मायन्समध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले निमेश्री निवास मिनय्या चिंताला (वय ५८) यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ६ जुलै रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास ते मायन्स परिसरातील टी-पॉईंट भागात गस्त घालत असताना तेथे ठेवलेली ४ एमएस जाडीची सुमारे २,००० फूट ॲल्युमिनियम तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेशोध पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेत सूरज शालिक क्षीरसागर (वय ३२, रा. बाबापूर, सध्या साखरी), प्रीतम सुरेश बेसूरवार (वय ३०, रा. साखरी) आणि निखील विठोबा मुक्के (वय २९, रा. चाली, ता. राजुरा) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत चोरीची कबुली मिळाल्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली १ लाख रुपयांची ॲल्युमिनियम तार आणि ती वाहून नेण्यासाठी वापरलेले एमएच-३५-एजे-४३१३ क्रमांकाचे टाटा आयशर वाहन (अंदाजे किंमत ३० लाख रुपये) जप्त करण्यात आले. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात गुन्हेशोध पथकाचे सपोनि लक्ष्मण लोकरे तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






