chandrapur dj permission

चंद्रपुरात डीजे बंदी उठली?; अटी व शर्तींसह वाजवण्यास मंजुरी? आमदार जोरगेवार यांची मध्यस्थी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 15, 2026

चंद्रपूर – (chandrapur dj permission) बाबत चंद्रपूर जिल्ह्यातील गणेश मंडळांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकी दरम्यान डीजे वाजवण्यावर घालण्यात आलेल्या बंदीवर अखेर तोडगा काढण्यात आला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी गणेश मंडळे आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेतली. या सकारात्मक चर्चेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात अटी व शर्तींसह मर्यादित आवाजात डीजे वाजविण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. पण पोलीस विभागाने अद्यापही अधिकृत असा आदेश जारी न केल्याने डीजे खरंच वाजणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक नोपानी यांनी यावर आपली अधिकृत भूमिका मांडलेली आहे. (माजी नगरसेवक अजय सरकार ३ महिन्यांकरिता हद्दपार)

chandrapur dj permission : गणेश भक्तांसाठी पोलीस प्रशासनाचा मोठा दिलासा

गणेशोत्सवात डीजेवर घालण्यात आलेल्या बंदीबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी गणेश मंडळे, गणेशभक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मध्यस्थी करत या प्रश्नावर तोडगा काढला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात अटी व शर्तींसह मर्यादित आवाजात डीजे वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, तुषार सोम, गणेश मंडळातील दर्शन बुरडकर, ईश्वर वाघमारे, हर्षल कानमपल्लीवार, रोहित लडके, गणेश गोहकर, शेखर हजारे, केतन लुटे तसेच डीजे असोसिएशनचे उमेश लांडगे, देवाशीष गांगुली, निशांत निखार, प्रज्वल चोपावर आदी उपस्थित होते.

यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिले होते. या निर्णयामुळे गणेश मंडळे, गणेशभक्त तसेच डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर गणेशभक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडत बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी आज, बुधवारी गणेशभक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेत धार्मिक भावना, उत्सवाचे पारंपरिक स्वरूप तसेच कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय या सर्व बाबींचा विचार करण्यात आला.

चर्चेनंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने हा प्रश्न मार्गी लागला. यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, नागरिकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीने मोठे साऊंड सिस्टिम न लावता तसेच अत्यंत मोठ्या आवाजात डीजे न वाजविता मर्यादित आवाजात डीजे वाजविण्यास परवानगी देण्यात येईल.

मात्र, यासाठी संबंधित गणेश मंडळ किंवा डीजे मालकांनी पोलीस प्रशासनाकडे स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक राहील. या स्वयंघोषणापत्राद्वारे शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यात येईल, तसेच सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी गणेशोत्सव हा श्रद्धा आणि उत्साहाचा सण असून तो शांततेत व नियमांचे पालन करून साजरा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. गणेशभक्तांच्या धार्मिक भावना जपत नागरिकांनाही कोणताही त्रास होणार नाही, असा समतोल राखत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे गणेश मंडळे आणि डीजे असोसिएशनमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, यंदाचा गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

गणेशोत्सव काळात पारंपरिक वाद्याचा वापर करावा असे निर्देश पोलीस प्रशासनाने यापूर्वी दिले होते, यावर आमदार जोरगेवार यांनी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची भेट घेत, डीजे संघटना यांची बाजू जाणून घेतली, यावर पोलीस अधीक्षकांनी सुप्रीम कोर्टाच्या नियमांची आमदार जोरगेवार व डीजे संघटना यांना जाणीव करून दिली. जे कायद्यात आहे ते होणार. पोलीस अधीक्षक नोपानी म्हणाले कि सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान डीजे व लाऊड स्पीकर वापरण्यास बंदी केली आहे. आज डीजे संघटनांनी नियमांचे उल्लंघन होणार नाही अशी ग्वाही दिली, स्वयं घोषणापत्रात ते काय लिहून देतात व नियमांचे पालन करतात कि नाही त्यावर आमचे लक्ष आहे. नियमांचे उल्लंघन झाले तर कारवाई निश्चित आहे.

“सुप्रीम कोर्टाच्या 2005 च्या ‘Noise Pollution’ प्रकरणातील निर्णयानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत डीजे व लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी आहे. राज्य सरकारला वर्षातून केवळ 15 दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मर्यादित सूट देण्याचा अधिकार आहे. ध्वनी मर्यादा ओलांडल्यास पोलिसांना डीजे बंद करून उपकरणे जप्त करण्याचा अधिकार आहे.” चंद्रपूर जिल्ह्यात डीजेवरील बंदी उठली असे सध्यातरी म्हणता येणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाचा प्रसिद्ध निर्णय

“In Re: Noise Pollution (2005)” या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की कोणालाही दुसऱ्याच्या शांततेच्या आणि आरोग्याच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही. ध्वनीप्रदूषण हे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम करते.

📊 ध्वनी मर्यादा (Noise Limits)

निवासी भाग

दिवसा (6 AM – 10 PM)

55 dB

रात्री (10 PM – 6 AM)

45 dB

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment