Chandrapur Investment Fraud । सोन्याचे आमिष दाखवून चंद्रपुरातील ९३ गुंतवणूकदारांची २.७७ कोटींची फसवणूक

Chandrapur Investment Fraud : चंद्रपूर: गुंतवणुकीवर कमी दिवसांत भरघोस परतावा आणि प्लॉट बुकिंगवर चक्क सोन्याचे नाणे देण्याचे आमिष दाखवून चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ९३ गुंतवणूकदारांची २ कोटी ७७ लाख ४८ हजार ९२६ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर या महाघोटाळ्याचा पुढील तपास करत आहे. (घरात घुसून विवाहितेचा गळा चिरला)

हैदराबाद येथील टेकुला मुक्तीराज याने ‘ग्रँड फॉर्च्युनर इन्फ्रा डेव्हलपर्स’ नावाची कंपनी स्थापन केली होती. आरोपी बेल्लारी व्यंकटाचारी आणि अनुमंडला रेड्डी यांनी ही फर्म तेलंगणा येथे सुरू केली, तर टेकुला मुक्तीराजने स्थानिक एजंट्सच्या मदतीने तिचे जाळे चंद्रपुरात पसरवले होते. या कंपनीचे चंद्रपुरातील एजंट अमोल गणेश महाजन, भालचंद्र किसन वडस्कर, अंजन्ना बेलम आणि मोतीलाल सरकार यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची आर्थिक आमिषे दाखवली.

Chandrapur Investment Fraud : सोन्याच्या आमिषाने नागरिकांना जाळ्यात ओढले

कंपनीत १ लाख १० हजार रुपये गुंतवल्यास ५ ग्रॅम सोने आणि २०० दिवसांपर्यंत रोज ९३५ रुपये परतावा मिळणे, ५ लाख रुपयांचा प्लॉट घेतल्यास ५०० दिवसांत प्लॉटची संपूर्ण रक्कम परत मिळणे आणि प्लॉट बुकिंगसाठी १ लाख ६५ हजार रुपये भरल्यास १० ग्रॅम सोने मिळणे, अशा कमीत कमी दिवसांत जास्त परतावा देण्याच्या भूलथापा त्यांनी नागरिकांना मारल्या.

या भूलथापांना बळी पडून गडचांदूर येथील रहिवासी रेवनाथ आनंदराव एकरे यांनी आपल्या १४ सहकाऱ्यांसह मिळून कंपनीत तब्बल २ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, काही दिवस उलटूनही आश्वासनाप्रमाणे परतावा किंवा सोने न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

रेवनाथ एकरे यांच्या तक्रारीवरून १८ नोव्हेंबर २०२२ रोजी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली असून, केवळ एकरेच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ९३ गुंतवणूकदारांची २ कोटी ७७ लाख ४८ हजार ९२६ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून या प्रकरणातील तीन मुख्य संशयित आरोपी पोलीस यंत्रणेला गुंगारा देत असून फरार आहेत. यामध्ये दुर्गा माता मंदिराजवळ, बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथील रहिवासी मोतीलाल दुलाल सरकार, साई बालाजी कॉम्प्लेक्स, एनएफसी कॉलनी, बंडलगुडा, हैदराबाद येथील बेल्लारी व्यंकटाचारी आणि बालाजी हिल्स कॉलनी, मेडचल, तेलंगणा येथील अनुमंडला महेंदर रेड्डी यांचा समावेश आहे.

या आरोपींविषयी आपापल्या परिसरात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे संपर्क साधावा. तसेच पोलीस नियंत्रण कक्षाच्या ०७१७२ – २७३२५८ व २६४७०२ या क्रमांकावर किंवा पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या ८८८८१८८५२९ आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर यांच्या ९३५९२५८३६५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment