चंद्रपूर – चंद्रपूर सायबर फसवणूक प्रकरणात पोलिसांनी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून एका २१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. एटीएममधून कमी आलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने एका शिक्षिकेच्या खात्यातून ५ लाख ४३ हजार रुपये काढल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने बँक कर्मचारी असल्याचे भासवून बनावट APK पाठवली. चंद्रपूर सायबर पोलिसांच्या पथकाने कोलकात्यात चार दिवस शोधमोहीम राबवली. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पुढील तपास सुरू आहे. (वरोऱ्यात ४२ तोळे सोने व रोख असा २६ लाख रुपयांचा ऐवज लंपास, वाचा बातमी)
चंद्रपूर सायबर फसवणूक: नेमके काय घडले?
चंद्रपूर शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे एटीएममधून कमी झालेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने एका ५८ वर्षीय शाळेच्या मुख्याध्यापिकेची तब्बल ५ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगालमधील आंतरराज्यीय सायबर भामट्याला चंद्रपूर सायबर (फसवणूक) पोलिसांनी कोलकाता येथून मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. अंगद सुरज प्रजापती (वय २१, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या सायबर ठगाचे नाव असून, पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
एटीएममधून ९०० रुपये कमी आले होते, चंद्रपूर सायबर फसवणूक
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की, पीडित महिला मुख्याध्यापिकेने गत ३० ऑगस्ट २०२६ रोजी एका बँकेच्या एटीएमधून ५ हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यातून ९०० रुपये कमी आले होते, ज्याची त्यांनी बँकेत रीतसर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला व समोरच्या व्यक्तीने आपण बँक कर्मचारी असल्याचे भासवून एटीएममधून ९०० रुपये कमी आल्याबाबत विचारणा करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सायबर भामट्याने व्हॉट्सअॅपवर एक बनावट एपीके (APK) ऍप्लिकेशन पाठवून ते डाऊनलोड करण्यास भाग पाडले आणि त्यामध्ये एटीएम पिन व सीव्हीव्ही (CVV) माहिती भरण्यास सांगून विविध ऑनलाईन व्यवहारांद्वारे खात्यातील ५ लाख ४३ हजार रुपये परस्पर लांबवले.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे, चंद्रपूर येथे अपराध क्र. ००६/२०२६ नुसार कलम ३१८(४), ३१९(२), ६१(२), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ सह कलम ६६ (क), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
चंद्रपूर सायबर फसवणूक, कोलकात्यात चार दिवसांची शोधमोहीम
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुनिल गाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाने ही कारवाई केली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गिरी, पोलीस अंमलदार राहुल पोंदे, अनिमेश भोंगळे व पंकज बावणे यांच्या विशेष पथकाने पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने सतत चार दिवस आणि रात्र कसोशी शोधमोहीम राबवत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उल्डाडांगा पोलीस स्टेशन हद्दीतून संशयित आरोपी अंगद प्रजापती याला जाळ्यात अडकवले.
आरोपी न्यायालयीन कोठडीत; तपास सुरू, चंद्रपूर सायबर फसवणूक
सदरची ही उल्लेखनीय कामगिरी सपोनि राजेंद्र सोनवणे, सपोनि अनिसा सय्यद, सपोउपनि मुजावर अली, पोहवा कार्तिक खनके, उमेश रोडे, पोअं गुणवंत मुंडके, साहिल आवारी, मपोअं छाया शंभरकर, पुजा जांभुळे, अंजली घिवे, श्रुतीका घाईत (सर्व सायबर पोलीस स्टेशन, चंद्रपूर) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपीला चंद्रपूर येथे आणून ३ दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली असून, कसून चौकशीदरम्यान त्याच्या इतर साथीदारांचा व गुन्ह्याच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेतला जात आहे. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीची चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली असून, या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या प्रलोभनाला बळी न पडण्याचे तसेच बँक अधिकारी कधीही फोनवर गोपनीय माहिती किंवा एपीके फाईल मागत नसल्याने सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







