ब्रह्मपुरी – ब्रह्मपुरी फटाका वाद प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील फवारा चौक परिसरात दिवाळीच्या रात्री हा प्रकार घडला. फिर्यादी विवेक राऊत यांच्या तक्रारीनुसार, दुकानासमोर लावलेल्या फटाक्यांच्या माळेवरून वाद झाला. दोघांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप आहे. ब्रह्मपुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(३) आणि २९६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. हे आरोप असून तपास सुरू आहे. (फटाक्यावरून वाद, कुटुंबाला मारहाण, वाचा बातमी)
ब्रह्मपुरी फटाका वाद: नेमके काय घडले?
शहरात दिवाळीच्या दिवशी एका प्लॅस्टिक दुकानदाराच्या दुकानासमोर फटाक्यांच्या माळावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या दोघांनी दुकानदारासह उपस्थित लोकांसोबत हुज्जत घालून अश्लील शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
फवारा चौकात लक्ष्मीपूजनानंतर वादाची सुरुवात, ब्रह्मपुरी फटाका वाद
प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी शहरातील गुजरी वार्ड येथील फवारा चौक भागात विवेक दादाजी राऊत यांचे ‘ब्रम्हा प्लॅस्टिक’ नावाचे दुकान आहे. दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन असल्याने रात्री आठ वाजता त्यांनी दुकानात पूजा केली. पूजा आटोपल्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानातील कामगारांनी दुकानासमोर असलेल्या गल्लीत फटाक्याची माळ लावली होती. यादरम्यान, त्याच वार्डातील राहणारे विनोद पिल्लारे आणि सुरज उर्फ गोलू ईश्वर पिल्लारे हे दोघे जण दुचाकीने त्या ठिकाणाहून जात असताना त्यांनी थेट फटाक्यांच्या माळावरून दुचाकी नेली आणि त्या माळाला लात मारली. हा प्रकार पाहून फिर्यादी विवेक राऊत यांनी त्यांना “तुम्हाला माणूसकी नाही का?” अशी विचारणा केली.
फिर्यादीची पोलिसांकडे तक्रार, ब्रह्मपुरी फटाका वाद
यावर संशयित आरोपी दारूच्या नशेत असल्याने त्यांनी विनाकारण वाद घालायला सुरुवात केली आणि फिर्यादीला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकारादरम्यान दुकानातील कर्मचारी निखिल जिभकाटे तसेच शेजारी राहणारे अनिल जनार्धन राऊत आणि मंगेश कुशवाह हेसुद्धा तिथेच उपस्थित होते. जेव्हा उपस्थितांनी आरोपींना शिवीगाळ करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते अधिकच आक्रमक झाले आणि फिर्यादीसह त्यांचे भाऊ व वडिलांना मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आले. या झटापटीत आरोपी दारूच्या नशेत असल्यामुळे दुकानामोरील पायऱ्यांवर पडले. त्यानंतर आजूबाजूच्या मार्केटमधील नागरिकांनी तातडीने मध्यस्थी करून भांडण सोडवले आणि दोन्ही आरोपींना तिथून बाजूला नेले. मात्र, त्यानंतरही आरोपी सतत अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत राहिले.
या संपूर्ण प्रकारानंतर पीडित दुकानदाराने तात्काळ पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची तोंडी तक्रार दिली. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे ब्रह्मपुरी पोलिसांनी आरोपी विनोद पिल्लारे आणि सुरज उर्फ गोलू ईश्वर पिल्लारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३५१(३) आणि २९६ नुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जगदीश सुधाकर जाडे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







