वाघाचे अवयव जप्त करणाऱ्या ब्रह्मपुरी वनविभागाचे चिमूर येथील कार्यालय

अस्वलाच्या मृत्यूमुळे उघड झाली वाघाची शिकार, अवयव जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 24, 2026

चिमूर – वाघाचे अवयव जप्त करून ब्रह्मपुरी वनविभागाने चिमूर तालुक्यातील आरोपी फकिरा रणदिवे याला अटक केली आहे. बोरगाव शेत परिसरातील अस्वल मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत हा प्रकार उघड झाल्याचे वनविभागाने २४ नोव्हेंबर २०२६ च्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.

वनविभागाच्या माहितीनुसार, आरोपीने दोन वर्षांपूर्वी वाघाची शिकार केल्याची कबुली दिली. त्याच्या घरातून वाघाची ६ नखे, २ सुळे दात आणि १ हाड जप्त करण्यात आले. न्यायालयाने २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वनकोठडी सुनावली आहे. (विद्युत कुंपणाने घेतला अस्वलाचा जीव, वाचा सविस्तर)

वाघाचे अवयव जप्त: वनविभागाला काय सापडले?

ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या चिमूर प्रादेशिक परिक्षेत्रातील बोरगाव शेत परिसरात शेताभोवतीच्या तारेच्या कुंपणात सोडलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मादी अस्वल आणि तिच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर वनविभागाने केलेल्या सखोल चौकशीत संबंधित आरोपीने दोन वर्षांपूर्वी याच शेतात वाघाची शिकार करून त्याचे अवयव लपवून ठेवल्याची धक्कादायक कबुली दिली असून, वनविभागाने आरोपीच्या घरातून वाघाचे अवयव जप्त करत त्याला अटक केली आहे.

ब्रह्मपुरी वनविभागाने २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या माहितीनुसार, उपक्षेत्र चिमूर आणि नियतक्षेत्र चिमूर येथे २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास वनरक्षक अस्वल व तिच्या पिल्लांचा मागोवा घेण्यासाठी बोरगाव शेत परिसरात गस्त घालत होते. त्या दरम्यान मौजा बोरगाव रोडी रिठ येथील सर्व्हे क्रमांक १० मध्ये एक अस्वल आणि तिचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी, सहायक वनसंरक्षक (तेंदू) ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिमूर यांनी मानद वन्यजीव रक्षक अमोदभाऊ गौरकर यांना सोबत घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता शेताभोवती असलेल्या तारेच्या कुंपणामध्ये सोडलेल्या जिवंत विद्युत प्रवाहामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

मृतावस्थेत आढळलेले अस्वल मादी असून तिचे वय अंदाजे पाच ते सहा वर्षे, तर तिच्या पिल्लू (मादी) चे वय अंदाजे चार ते पाच महिने असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात फकिरा संभाजी रणदिवे (रा. तळोधी नाईक) याने सदर शेत यादव दौलत गोठे यांच्याकडून तीन वर्षांकरिता ठेक्याने घेतले असल्याचे आणि शेतातील तारेच्या कुंपणामध्ये सोडलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाने अस्वल व पिल्लू ठार झाल्याचे त्याने कबूल केले आहे.

या घटनेनंतर वनविभागाच्या पथकाने आरोपी फकिरा संभाजी रणदिवे याची कसून चौकशी केली असता आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आला. चौकशीदरम्यान त्याने मौजा बोरगाव रोडी रिठ येथील याच सर्व्हे क्रमांक १० च्या शेताभोवती असलेल्या तारेच्या कुंपणात जिवंत विद्युत प्रवाह सोडून दोन वर्षांपूर्वी एका वाघाची शिकार केल्याचे कबूल केले. शिकार केल्यानंतर मृत वाघाचे शव त्याच शेतातील सर्व्हे क्रमांक १० मध्ये खड्डा खणून पुरण्यात आल्याचेही त्याने सांगितले.

पुढे जुलै २०२६ मध्ये पुरलेल्या मृत वाघाचे नखे ६ नग, सुळे दात २ नग आणि हाड १ नग विक्रीच्या उद्देशाने बाहेर काढून स्वतःच्या घरी नेल्याची कबुली आरोपीने दिली. या कबुलीनंतर वनविभागाने आरोपीच्या घरातून वाघाचे हे अवयव जप्त केले असून आरोपीला अटक करून विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय, चिमूर यांच्यासमक्ष हजर केले. न्यायालयाने आरोपीला २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास डॉ. कुमारस्वामी एस. आर. (उपवनसंरक्षक, ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एम. बी. गायकवाड (सहायक वनसंरक्षक, तेंदू, ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी), के. बी. देऊरकर (वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक, चिमूर) आणि तेजस बा. सुर्यवंशी (वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक, तळोधी) हे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment