Baby Trafficking प्रकरणात फरार आरोपीला जलनगरातून अटक

baby trafficking : चंद्रपूर – पैश्यासाठी २ बाळ विकले, तिसरे बाळ विकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले, हि धक्कादायक बाब नागपुरात घडली मात्र चंद्रपूर पोलिसांनी त्यावर कारवाई करीत हे प्रकरण उघडकीस आणले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी मुख्य आरोपी अजय फुलझेले ला ३ जून रोजी जलनगर भागातून अटक केली. (माजरीत तरुणाचा मृतदेह, हत्येची आशंका)

२७ मे पासून आरोपी अजय फुलझेले हा पसार झाला होता, मानव तस्करीच्या या प्रकरणातील मुख्य आरोपी हा अजय होता, आरोपीला तात्काळ अटक करावी असे निर्देश पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिले होते. गुन्हे शोध पथकाने त्याला इतरत्र शोधले मात्र तो चंद्रपुरात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी २६ वर्षीय अजय प्यारेलाल फुलझेले ला कंजर मोहल्ला जलनगर भागातील गीताबाई कंजर यांच्या घरून ताब्यात घेण्यात आले. अजय हा गीताबाई यांच्या घरी किरायाने राहत होता.

Baby Trafficking प्रकरण कसे उघड झाले?

या प्रकरणातील आरोपी महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिची ओळख अजय फुलझेले याच्याशी झाली. दोघेही आपल्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र, काही दिवसांतच नराधम अजयची नजर त्या अल्पवयीन मुलीवर पडली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला.
मुलगी गरोदर राहिल्याचे समजताच चंद्रपुरात वाच्यता होईल या भीतीने अजय आणि तिच्या आईने तिला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. तिथे रुग्णालय प्रशासनाला संशय येऊ नये म्हणून, “पूर परिस्थितीमध्ये आमची सर्व कागदपत्रे वाहून गेली” अशी खोटी कथा रचली आणि मुलीचे वय २० वर्षे असल्याचे सांगितले. वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांनी नागपूरच्या अजनी पोलिसांकडे ‘एमएनसी’ पाठवली. अजनी पोलिसांनी ‘झिरो एफआयआर’ नोंदवत हे प्रकरण चंद्रपूर पोलिसांकडे वर्ग केले.

पीडित मुलीच्या आईला ताब्यात घेतल्यानंतर तिने यापूर्वी स्वतःचीच दोन मुले तेलंगणा आणि स्थानिक पातळीवर प्रत्येकी दोन लाख रुपयांना विकली होती. अल्पवयीन मुलीच्या पोटी जन्माला आलेल्या या नवजात बाळाचीही ती अशाच प्रकारे विक्री करणार होती, असे समोर आले. पोलिसांनी मानवी तस्करी चे कलम जोडून बाळाची खरेदी करणाऱ्या एका महिलेला तेलंगणा राज्यातील कागजनगर येथून तर दुसऱ्या महिलेला चंद्रपूर येथून बेड्या ठोकल्या.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रामनगर प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनि शिवाजी नागवे, पोउपनि कृष्णा दराडे, पोलीस कर्मचारी आनंद खरात, जितेंद्र आकरे, शरद कुडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैतामी, प्रकाश बल्की, मनीषा मोरे, संदीप कामडी, रवीकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल्ल पुप्पलवार, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, संदीप गेडाम, प्रकाश मडावी, ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

Leave a Comment