चंद्रपूर: Illegal Hunting Trap मुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. बाबराळा गावाजवळ डुकरांच्या शिकारीसाठी ठेवलेल्या गावठी स्फोटकाचा चावा घेतल्याने एका सहा वर्षीय बैलाचा जबडा उडाला. या भीषण घटनेत बैल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पशुवैद्यकीय उपचार सुरू आहेत. अज्ञात आरोपीविरुद्ध मूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. (अंगुठी चमकविण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक)
मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबराळा गावालगत एका अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटनेत डुकराची शिकार करण्यासाठी बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलेल्या गावरान स्फोटकाचा चावा घेतल्याने एका ६ वर्षीय निष्पाप पांढऱ्या रंगाच्या बैलाचा जबडा छिन्नविच्छिन्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या भीषण स्फोटात अंदाजे ४०००० रुपये किमतीच्या या बैलाचे तोंड संपूर्णपणे फुटले असून त्याची जीभ तुटून खाली लोंबकळत आहे, तर दात तब्बल ५ फूट अंतरावर उडून पडले आहेत. याप्रकरणी मूल पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Illegal Hunting Trap मुळे बैल गंभीर जखमी
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बाबराळा येथील रहिवासी असलेले ६५ वर्षीय शेतकरी चंद्रकांत सखाराम गोहणे हे आपल्या ३ एकर शेतीवर दोन बैलांच्या साहाय्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ६ जून २०२६ रोजी नेहमीप्रमाणे शेतातील वखरणीचे काम आटोपून दुपारी २ वाजता ते घरी आले होते. सायंकाळी उन्हाचा तडाखा जास्त असल्याने त्यांनी दोन्ही बैलांना पाणी पिण्यासाठी आणि चरण्यासाठी गावालगत असलेल्या मामा तलावाच्या दिशेने सोडून दिले. दरम्यान, सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास तलावाच्या बाजूने अचानक फटाका फुटल्यासारखा प्रचंड मोठा आवाज झाला. आवाज ऐकून चंद्रकांत गोहणे व त्यांचा मुलगा विनोद गोहणे यांच्यासह गावातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली.
फिर्यादीने घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांचा एक बैल रक्ताच्या थारोळ्यात प्रचंड वेदनेने तडफडत होता. तलावाच्या किनाऱ्यावरील हिरवळीत अज्ञात शिकाऱ्याने डुकरांना मारण्याच्या उद्देशाने गावठी स्फोटक पदार्थ लपवून ठेवले होते. दुर्दैवाने या बैलाने त्याला चारा समजून तोंडात घेताच त्याचा मोठा स्फोट झाला आणि बैलाचे तोंड चेंदामेंदा झाले. सध्या जखमी बैलावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी चंद्रकांत गोहणे यांनी ७ जून रोजी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून मूल पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजय रामकृष्ण राठोड यांच्या मार्गदर्शनात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २८८ आणि ३२५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार इंदल रामराव राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण मूल तालुक्यात प्राणिप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांनी अशा शिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
