चंद्रपूर : हॉटेल अंबिका कर्जवसुली प्रकरणावरून भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि कर्जदार तुषार सातपुते यांच्यातील वाद वाढला आहे. सातपुते यांनी पत्रकार परिषदेत बँकेवर मालमत्तेचा बेकायदेशीर कब्जा घेतल्याचा आरोप केला. त्यांनी या प्रकरणाची आरबीआयकडे तक्रार करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. सातपुते यांच्या माहितीनुसार, नागपूर कर्ज वसुली न्यायाधिकरणाने बँकेचा लिलाव रद्द केला आहे. बँकेची बाजू अद्याप समजू शकलेली नाही. (२२ ऑक्टोबर पासून चंद्रपुरात एफएफएस प्रणाली लागू होणार, वाचा बातमी)
भद्रावती येथील ‘हॉटेल अंबिका’ मालमत्तेच्या कर्जवसुली प्रकरणावरून भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि कर्जदार तुषार सातपुते यांच्यातील वाद आता अत्यंत विकोपाला गेला असून, बँकेच्या अधिकाऱ्यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा मिळवला, असा गंभीर आरोप तुषार सातपुते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
हॉटेल अंबिका कर्जवसुली वादाची पार्श्वभूमी
या संपूर्ण गैरकारभाराची भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) तक्रार करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. सातपुते यांनी १६ ऑगस्ट २०१८ रोजी बँकेकडून कर्ज घेतले होते आणि या कर्जवसुलीविरोधात त्यांनी नागपूर कर्ज वसुली न्यायाधिकरणात (डीआरटी) दाद मागितली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच, २२ ऑगस्ट २०२४ रोजी नायब तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्तात हॉटेलला टाळे ठोकले. सातपुते यांनी ‘एक रकमी कर्जफेड योजने’ची तयारी दर्शवूनही बँकेने मालमत्तेचा नियमबाह्य लिलाव जाहीर केला होता. मात्र, २८ सप्टेंबर २०२६ रोजी डीआरटीने हा लिलाव बेकायदेशीर ठरवून रद्द केला आणि जप्तीचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश बँकेला दिले.
या पत्रकार परिषदेत सातपुते यांनी बँकेवर आणखी एका गंभीर घोटाळ्याचा आरोप केला. विजय घाटे यांनी घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतरही बँकेने त्यांचे दोन प्लॉट गहाणमुक्त केले नाहीत, आणि उलटपक्षी बनावट कागदपत्रांच्या आधारे विजय पत्तीवार यांना त्याच प्लॉटवर नियमबाह्य कर्जवाटप करून फसवणूक केली. या सर्व प्रकारामुळे भंडारा अर्बन बँकेच्या मागील ५ वर्षांतील सर्व कर्जप्रकरणांचे विशेष फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे, तसेच दोषी बँक व्यवस्थापक, अधिकारी व ऑडिटर्सवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी सातपुते यांनी केली. या पत्रकार परिषदेला मनसेचे राजू कुकडे उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






