चंद्रपूर : चंद्रपूर दत्तक प्रकरणे निकाली काढण्याच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात एकाच दिवशी ११ प्रलंबित दत्तक प्रकरणे निकाली निघाली. यात चार नात्यांतर्गत, चार सावत्र आणि तीन अनाथ बालकांच्या प्रकरणांचा समावेश आहे. एका अनाथ बालकाला युरोपमधील माल्टा येथील पालकांचे छत्र मिळाले. उर्वरित दोन बालकांचे पालक कर्नाटकातील हुबळी आणि महाराष्ट्रातील ठाणे येथील आहेत.
चंद्रपूर दत्तक प्रकरणे एकाच दिवशी निकाली
मुंबई उच्च न्यायालयाच्या ४ मे २०२६ च्या आदेशानंतर हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहेत. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मध्ये सन २०२१ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार दत्तक प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. (आश्रमशाळेतील ८२ मुलांना केले अर्धंटक्कल, वाचा हि बातमी)
या तरतुदीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका क्र. ३२०६५/२०२२ दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दि. ४ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ (सुधारित अधिनियम २०२१) व संबंधित तरतुदींची वैधता कायम ठेवली. त्यानुसार दत्तक नियमावली, २०२२ अंतर्गत दत्तक प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत.
या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथील एकूण ११ प्रलंबित दत्तक प्रकरणे अंतिम आदेशासाठी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आणि विधी तथा परिविक्षा अधिकारी सचिंद्र नाईक यांनी या सर्व प्रकरणांची आवश्यक पडताळणी केली.
त्यानंतर संबंधित दत्तक इच्छुक पालकांना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासमोर उपस्थित करण्यात आले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एकाच दिवशी सर्व ११ प्रकरणांमध्ये दत्तक आदेश पारित करून प्रकरणे निकाली काढली.
तीन अनाथ बालकांना मिळाले कुटुंब
निकाली काढण्यात आलेल्या ११ प्रकरणांमध्ये चार नात्यांतर्गत दत्तक प्रकरणे, चार सावत्र दत्तक प्रकरणे आणि तीन अनाथ बालकांच्या दत्तक प्रकरणांचा समावेश आहे. तीन अनाथ बालकांपैकी एका बालकाचे दत्तक प्रकरण युरोपमधील माल्टा येथील पालकांसोबत, दुसऱ्या बालकाचे कर्नाटकातील हुबळी येथील पालकांसोबत, तर तिसऱ्या बालकाचे महाराष्ट्रातील ठाणे येथील पालकांसोबत निकाली काढण्यात आले.
यापूर्वी सन २०२२ मध्ये जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या आदेशान्वये एक दत्तक प्रकरण निकाली काढण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर दत्तक प्रकरणांबाबतची कार्यवाही जिल्हा न्यायालयामार्फत करण्यात येत होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या दि. ४ मे २०२६ रोजीच्या आदेशानंतर दत्तक प्रकरणांमध्ये अंतिम आदेश पारित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्याने दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान होण्यास मदत होणार आहे. तसेच दत्तक इच्छुक पालकांना प्रक्रियेत होणारा विलंब कमी होण्यास मदत होईल.
अधिक माहितीसाठी १०९८ वर संपर्क
दत्तक प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी नागरिकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, आकाशवाणीच्या मागे, जिल्हा स्टेडियमजवळ, साईबाबा वॉर्ड, चंद्रपूर येथे संपर्क साधावा. तसेच चाईल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क साधता येईल, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय आर. साखरकर यांनी केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






