चंद्रपूर: चंद्रपूर वाघाचा हल्ला : चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आगरझरी परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारच्या सुमारास घडली. मंदाबाई सूर्यभान मंगाम (वय ६० वर्षे, रा. आगरझरी) असे मृत महिलेचे नाव आहे. चालू वर्षातील मानव-वन्यजीव संघर्षातील हा ३२ वा मृत्यू ठरल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (गुराख्याने केला वाघाचा प्रतिकार, वाचा हि बातमी)
चंद्रपूर वाघाचा हल्ला : शेतात काम करताना घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मंदाबाई मंगाम या आगरझरी-२ बिटातील राखीव वन कक्ष क्रमांक १८७ लगत असलेल्या स्वतःच्या शेत सर्व्हे क्रमांक १०/४ मध्ये शेतीची कामे करत होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.
घटनेची बातमी मिळताच मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री. शेगावकर आणि प्रादेशिक वनकर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरस्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे रवाना केला. घटनेनंतर प्रशासनाकडून मृत महिलेचे पती सूर्यभान लक्ष्मण मंगाम यांना घटनास्थळी तातडीने ५०,००० रुपयांची सानुग्रह मदत प्रदान करण्यात आली.
वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने संबंधित परिसरात कॅमेरा ट्रॅप (Camera Traps) लावले असून, वन कर्मचाऱ्यांकडून गावात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. गावकऱ्यांनी शेतात आणि जंगल परिसरात काम करताना विशेष खबरदारी बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. या घटनेचा पुढील तपास मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






