पोंभूर्णा: पोंभूर्णा वाघ हल्ला प्रकरणात घनोटी तुकूम परिसरात शुक्रवारी, २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे एक वाजता खळबळ उडाली. जंगलात गुरे चारणाऱ्या साईनाथ विठोबा मांडवगडे (५०, रा. घनोटी क्र. १) यांच्यावर वाघाने झडप घेतली. वनविभागाच्या कक्ष क्रमांक ८७ मध्ये ही घटना घडली. मांडवगडे यांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने प्रतिकार केल्याने वाघ जंगलात पळाला, असे सांगितले जाते. ते गंभीर जखमी असून त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, वाचा मानव वन्यजीव संघर्षाची बातमी)
पोंभूर्णा वाघ हल्ला: घनोटी तुकूम जंगलात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, साईनाथ मांडवगडे हे नेहमीप्रमाणे घनोटी तुकूम परिसरातील वनविभागाच्या कक्ष क्रमांक ८७ मध्ये गुरे चारण्यासाठी गेले होते. यादरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर अचानक झेप घेतली. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरून न जाता साईनाथ यांनी अत्यंत धैर्याने हातात असलेल्या कुऱ्हाडीच्या दांड्याने वाघावर उलट वार केले. त्यांच्या या अनपेक्षित प्रतिकारामुळे वाघाने तेथून जंगलाच्या दिशेने पळ काढला, ज्यामुळे साईनाथ यांचा जीव वाचला.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मांडवगडे यांना तातडीने पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या घटनेमुळे घनोटी तुकूम तसेच लगतच्या परिसरातील शेतकरी आणि गुराख्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या परिसरात तात्काळ गस्त वाढवून वाघाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे आणि बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






