चंद्रपूर: चंद्रपुरात chandrapur chain snatching ची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. रात्री फेरफटका मारणाऱ्या एका ५६ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्यांनी हिसकावली. ही घटना रविवारी रात्री दक्षिण नगर परिसरात घडली. दोन अज्ञात भामट्यांनी ६० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम सोन्याची साखळी पळवून नेली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. (हे हि वाचा – चंद्रपूरातील MSRTC वसाहतींमधून दुचाकी चोरी)
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दक्षिण नगर, केरला कॉलनी परिसरातील रहिवासी रेबा आशुतोष बिश्वास (वय ५६) या नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण करण्यापूर्वी गल्लीत फेरफटका मारण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या राधाकृष्ण मंदिराच्या रस्त्याने पायी जात असताना समृद्धी किराणा दुकानाजवळ पोहोचल्या. याच वेळी मागून एका काळया रंगाच्या दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण आले. काही समजण्याच्या आत दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने रेबा यांच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ज्यामध्ये गणपतीची मूर्ती असलेले लॉकेट आणि तुळशीची माळ होती, ती जोरात हिसकावून घेतली. या सोन्याच्या साखळीची किंमत सुमारे ६०,००० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिला तक्रारदाराने तात्काळ आरडाओरडा केला. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेने धाडस दाखवत चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी दुचाकी अतिशय वेगाने पळवत इंदिरा नगरच्या दिशेने पसार झाले.
घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ रामनगर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली व लेखी तक्रार नोंदवली. त्यांनी दिलेल्या वर्णनानुसार, दुचाकी चालवणारा तरुण २० ते २५ वर्षांचा, सावळ्या रंगाचा, डोक्यावर अर्धे टक्कल असलेला व चॉकलेटी रंगाचा शर्ट घातलेला होता, तर मागे बसलेला तरुण ३० ते ३५ वर्षांचा, सावळ्या रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला होता.
या प्रकरणी रामनगर पोलिसांनी १० ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०४(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमाननाथ उगले करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पळून गेलेल्या भामट्यांचा शोध सुरू आहे. भरवस्तीत झालेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






