Chandrapur Samadhi Ward Attack

चंद्रपूर शहरातील समाधी वॉर्डात मालमत्तेच्या वादातून ६० वर्षीय महिलेवर सत्तूरने जीवघेणा हल्ला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 7, 2026

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील समाधी वॉर्ड परिसरात (Chandrapur Samadhi Ward Attack) कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका ६० वर्षीय वृद्ध महिलेवर सत्तूरने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. लता चंद्रशेखर हजारे असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात सख्ख्या दीराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Chandrapur Samadhi Ward Attack : काय आहे संपूर्ण घटना?

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता चंद्रशेखर हजारे (वय ६०, रा. समाधी वॉर्ड, चंद्रपूर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या ‘गोकुळ’ नावाच्या घरामध्ये कुटुंबातील आठ सदस्यांचे हिस्से आहेत. त्यांचा लहान दीर राजेंद्र कृष्णराव हजारे हा घराच्या पहिल्या मजल्यावर वास्तव्यास असून, घराच्या मालकीच्या वादावरून तो अनेक वर्षांपासून त्यांच्याशी सतत वाद घालत होता. यापूर्वी ४ सप्टेंबर २०१६ रोजीही त्याने मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले असून नातेसंबंध लक्षात घेऊन त्यावेळी पोलीस तक्रार दिली नव्हती. (हे हि वाचा – भाजप नगरसेवकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल)

तक्रारीनुसार, ६ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लता हजारे या त्यांच्या घरातील स्वयंपाकघरात डायनिंग टेबलवर बसून वर्तमानपत्र वाचत असताना आरोपी राजेंद्र हजारे हा घरातील जिन्याने खाली आला. जुन्या वादाच्या कारणावरून त्याने लोखंडी सत्तूर हातात घेऊन त्यांच्या डोक्यावर जीव घेण्याच्या उद्देशाने वार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. दरम्यान, परिसरातील प्रेम सोनी व इतर नागरिकांनी तातडीने त्यांच्या डोक्यावरील जखमेवर कापड बांधून त्यांना ऑटोरिक्षाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात ७ जुलै रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment