महावितरण मोबाईल अॅपवर नादुरुस्त रोहित्र तक्रार नोंदवण्याची सुविधा

नादुरुस्त रोहित्र तक्रार आता मोबाईल अॅपवर एका क्लिकवर; महावितरणची नवी सुविधा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 8, 2026

चंद्रपूर- : नादुरुस्त रोहित्र तक्रार आता महावितरण मोबाईल अॅपद्वारे एका क्लिकवर नोंदवता येणार आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने ही सुविधा सुरू केली आहे. कोणत्याही ठिकाणच्या बंद किंवा नादुरुस्त रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) माहिती कोणालाही अॅपवरून देता येईल. त्यामुळे रोहित्र बदलणे किंवा दुरुस्त करणे लवकर शक्य होईल. अॅपसोबत महावितरणची वेबसाईट आणि कॉल सेंटरवरही तक्रार नोंदवता येईल.. (१२ तालुक्यातील पंचनामे १० ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करा, वाचा हि बातमी)

नादुरुस्त रोहित्र तक्रार महावितरण अॅपवर कशी कराल?

महावितरणने नादुरुस्त रोहित्र बदलण्यासाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तथापि, नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्राची माहिती प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचे दिसून आले. त्याची गंभीर नोंद घेत मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी नादुरुस्त रोहित्रांची माहिती कळविण्यासाठी नागरिकांना ‘महावितरण मोबाईल अॅप’द्वारे खास सोय उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्याप्रमाणे ही सुविधा अॅपवर कार्यान्वित झाली आहे.

९.२५ लाख रोहित्रांचे जिओ लोकेशनसह मॅपिंग पूर्ण

महावितरणकडून राज्यभरातील ९ लाख २५ हजार वितरण रोहित्रांचे (डीटीसी) जिओ लोकेशनसह मॅपींग पूर्ण झाले आहे. त्यामुळे केवळ लोकेशनच्या आधारे नादुरुस्त रोहित्रांची माहिती देणे कोणालाही ‘महावितरण मोबाईल अॅप’द्वारे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे हे अॅप डाऊनलोड केलेल्या सर्व मोबाईलधारकास कोणत्याही ठिकाणच्या बंद किंवा नादुरुस्त रोहित्रांची माहिती कळविण्याची सोय मराठी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी ‘प्ले स्टोअर’ किंवा ‘अॅपल स्टोअर’वर उपलब्ध आहे.

नादुरुस्त रोहित्राची अशी करा तक्रार

‘महावितरण मोबाईल अॅप’मध्ये ग्राहक क्रमांकासोबत लॉगिन किंवा लॉगिन न करता गेस्ट म्हणूनही नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवता येईल. ही माहिती कळविताना संबंधित नादुरुस्त रोहित्राच्या ठिकाणाजवळ असणे मात्र आवश्यक आहे. या अॅपमध्ये मुख्य पानावर ‘नादुरुस्त रोहित्राची माहिती नोंदवा’ या रकान्यावर क्लिक केल्यास पुढील पानावर नाव आणि व्हॉटस् अॅपचा मोबाईल क्रमांक (लॉगिन नसल्यास) विचारला जाईल. तत्पूर्वी या अॅपमधील लोकेशन परमिशन ‘ऑन’ असणे आणि मोबाईल संचाचे लोकेशन सुरू करणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक दिल्यानंतर ओटीपी निर्माण करण्यास सांगितले जाईल. हा ओटीपी संबंधितांना व्हॉटस् अॅपवर प्राप्त होईल.

ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर एका चौकटीत नादुरुस्त किंवा बंद रोहित्राचा ‘फोटो काढा’ असा पर्याय येईल. संबंधित नादुरुस्त रोहित्राचा केवळ फोटो काढावा. या चौकटीखालीच एका नकाशामध्ये अक्षांश-रेखांशासह रोहित्राचे रेखाचित्र, रोहित्राचे नाव व क्रमांक (डीटीसी नंबर) दिसेल. एकापेक्षा अधिक रोहित्र असल्यास जे नादुरुस्त आहे त्यावर क्लिक करता येईल. त्यानंतर ‘नोंद करा’ (सबमीट) पर्याय क्लिक केला की ही माहिती तात्काळ संबंधित कार्यालयातील अभियंता व जनमित्रांना मोबाईल संदेशाद्वारे प्राप्त होईल व रोहित्राची तपासणी करण्यात येईल. लहान दोष असल्यास रोहित्राची तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल किंवा रोहित्र नादुरुस्त असल्यास ते ताबडतोब बदलण्यात येईल.

रोहित्र दुरुस्त झाले किंवा बदलले याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना देखील व्हॉटस् अॅपद्वारे कळविण्यात येणार आहे.
महावितरणच्या वेबसाईट किंवा कॉल सेंटरद्वारे तक्रारीची सोय– मोबाईल अॅपसोबतच नादुरुस्त रोहित्राची तक्रार किंवा माहिती देण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर, संबंधित कार्यालय किंवा ग्राहक सुविधा केंद्रामध्ये किंवा २४ तास सुरु असलेल्या १८००२१२३४३५/ १८००२३३३४३५/ १९१२ किंवा १९१२० या टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध आहे. वेबसाईटवर ग्राहक रकान्यात जाऊन ‘ऑनलाइन तक्रार नोंदवा’मध्ये ग्राहक क्रमांकाशी संबंधित रोहित्र नादुरुस्त झाल्याची तक्रार नोंदविता येईल. यासह या वेबसाईट किंवा महावितरण मोबाईल अॅपवरील ‘ऊर्जा चॅट बॉट’द्वारे देखील इतर तक्रारींसोबतच मराठी व इंग्रजी संवादाद्वारे तक्रार दाखल करण्याची सोय उपलब्ध आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment